Madhya Pradesh Court Death Penalty: ज्या आईने दत्तक घेऊन मुलाला लहानाचं मोठं केलं, त्यानंच आईचा जीव घेतला. ज्यानं वृद्धापकाळात आधार द्यायचा होता, त्यानंच जीवन हिसकावलं. मध्य प्रदेशमध्ये एका दत्तक मुलानं आपल्या आईचा निर्घृण खून केला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या जिल्हा न्यायालयानं यावर संताप व्यक्त करत आरोपी मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तसंच अशा मुलाला पालकांनी का वाढवावं? असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला.

मध्य प्रदेशच्या जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश एल. डी. सोलंकी यांनी बुधवारी या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले की, जर कुंपणच शेत खायला लागलं तर शेतकऱ्यानं कुणावर विश्वास ठेवायचा. ज्या मुलानं वृद्धापकाळात आईचा आधार व्हायला हवं होतं, त्यानंच आईचा खून केला. मग अशा मुलाला वाढवून काय उपयोग?

न्यायाधीशांनी पुढे कठोर टिप्पणी करताना म्हटलं की, जर अशा प्रकरणात आपण जर उदारता दाखवली तर यापुढे मुलं नसलेले पालक कुणालाही दत्तक घेणार नाहीत आणि याचे प्रतिकूल परिणाम समाजावर होतील.

प्रकरण काय आहे?

विशेष सरकारी वकील राजेंद्र जाधव यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, ६ मे २०२४ रोजी शेवपूरमधील रेल्वे कॉलनी येथे राहणाऱ्या दीपक पचौरीने त्याची आई उषादेवी रुग्णालयातून घरी आली नसल्याची तक्रार नोंदवली. ८ जून रोजी उषादेवी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली गेली. दरम्यान दीपकच्या जबाबात विसंगती आढळून येत असल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यानेच आईचा खून केल्याचे कबूल केले.

उषादेवी आणि त्यांच्या पतीने २० वर्षांपूर्वी ग्वाल्हेर येथून दीपकला दत्तक घेतले होते. २०२१ साली उषादेवी यांचे पती भुवनेंद्र पचौरी यांचे निधन झाले. भुवनेंद्र पचौरी यांचे बँकेत १६.८५ लाख रुपये होते, यासाठी दीपकला नॉमिनी केले होते. मात्र दीपकने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गमावले.

उषादेवी यांच्या बँक खात्यातही ३२ लाखांच्या मुदत ठेवी होत्या. दीपकने या पैशांची मागणी करताच उषादेवी यांनी पैसे देण्यास नकार दिला. ६ मे रोजी उषादेवी आंघोळीनंतर घरातून वरच्या मजल्यावर जात होत्या, तेव्हा दीपकने त्यांना खाली ढकलले आणि लोखंडी रॉडने मारहाण करत साडीने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर घरातील बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह पुरला आणि त्यावर टाइल्स बसवल्या.

न्यायाधीशांनी केला चारही धर्मग्रंथाचा उल्लेख

न्यायाधीश सोलंकी यांनी सदर प्रकरणाचा निकाल देत असताना मातृहत्या पाप असल्याचे सांगितले. रामचरितमानसचा उल्लेख करत त्यांनी भगवान राम यांनी त्यांच्या पालकांबद्दल व्यक्त केलेली भावना बोलून दाखवली. “जो मुलगा आपल्या पालकांचे ऐकतो, जो पालकांना संतुष्ट करतो, तोच खरा भाग्यवान आहे”, हे भगवान राम यांचे वचनही न्यायाधीश न्यायालयात उद्धृत करतात.

न्यायाधीश सोलंकी यांनी श्रावण बाळाचेही उदाहरण दिले. “जो आपल्या आई-वडिलांची सेवा करतो, तोच खरा शूर आहे”, शीखांचा पवित्र गुरु ग्रंथ साहिब मधील या श्लोकाचे उदाहरण त्यांनी दिले. तसेच कुराणमध्येही आई-वडिलांशी आदराने वागण्याची सूचना देण्यात आल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

बायबलमध्येही आई-वडिलांचा आदर राखण्यास सांगितले आहे, असे न्यायाधीश म्हणाले. जो कुणी आई-वडिलांना मारहाण करेल, त्याला मृत्यूदंड द्यावा, असेही बायबलमध्ये म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धर्मग्रंथामधील दाखल्यांचे उदाहरण देत न्यायाधीश सोलंकी यांनी आरोपी दीपक पचौरीला भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.