तमिळनाडूच्या करुर जिल्ह्यामध्ये तमिळ वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या सभेदरम्यान २७ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणयात यावे, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
करुर चेंगराचेंगरीमध्ये ४१ व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि इतर ६०पेक्षा जास्त जखमी झाले होते. न्या. एन सेंथिलकुमार यांच्या एकल पीठाने या ‘एसआयटी’चे नेतृत्व पोलीस महानिरीक्षक आस्रा गर्ग यांच्याकडे सोपवले आहे. यावेळी न्यायालयाने ‘टीव्हीके’च्या पदाधिकाऱ्यांची कामाची पद्धत आणि विजय यांनी दुर्घटनेनंतर दिलेला प्रतिसाद यावर टीका केली. “चेंगराचेंगरीनंतर पक्षाचा नेता गायब झाला आणि त्यांनी कोणताही खेद दर्शवला नाही,” असे न्यायाधीश म्हणाले.
या प्रकरणी पोलिसांनी थेट विजय यांना जबाबदार धरण्याचे टाळले असून केवळ स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या सौम्य हाताळणीबद्दलही न्यायालयाने नापसंती व्यक्त केली. “करुर चेंगराचेंगरीप्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यापासून तुम्हाला कोणी अडवले आहे,” असा प्रश्न न्या. सेंथिलकुमार यांनी सरकारी वकील हासन मोहम्मद जिना यांना विचारला.
तुम्ही कोणती कारवाई केली आहे? तुम्ही हे घडू दिले आणि आता म्हणता केवळ दोघांनाच अटक केली. याला जबाबदार कोण आहे? यांचे नेते विजय गायब झाले आणि लोकांना मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. – न्या. एन. सेंथिलकुमार, मद्रास उच्च न्यायालय