प्रयागराज : प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर भरलेल्या महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी, संक्रातीच्या मुहूर्तावर पहिले ‘अमृत स्नान’ झाले. महाकुंभासाठी १३ आखाड्यांचे साधू प्रयागराजमध्ये आले आहेत. त्यापैकी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाडा या दोन आखाड्यांच्या नागा साधूंना ‘अमृत स्नाना’चा पहिला मान मिळाला. पहाटे तीन वाजता ब्रह्ममुहूर्ताला हे स्नान सुरू झाले.

कडाक्याच्या थंडीला न जुमानता भाविकांनी स्नानाला सुरुवात केली. सकाळी साडेआठपर्यंत एक कोटी ३८ लाख भाविकांनी ‘अमृत स्नान’ केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी, पहिल्या दिवशी १.७५ कोटी भाविकांनी संगमावर स्नान केले होते.

अंगाला भस्म फासलेले नागा साधू आपापले भाले आणि त्रिशूळ घेऊनच शाही स्नानासाठी पाण्यात उतरले. त्यांच्यापैकी काहीजण घोड्यावर स्वार होऊन स्नानासाठी आले होते आणि त्यांनी स्वत:सकट घोड्यांनाही स्नान घडवले. ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ आणि ‘जय गंगामैय्या’ असे घोषणारूपी नामस्मरण करत विविध घाटांवर अनेक भाविक गटागटांनी पाण्यात उतरत होते. लहान मुलांना खांद्यावर घेऊन स्नान केले जात होते. तर काहीजण वृद्ध आईवडिलांना स्नानासाठी मदत करून पुत्र आणि कन्याधर्म निभावत होते.

हेही वाचा >>> शहरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य!

हे आपल्या शाश्वत संस्कृती आणि श्रद्धेचे जिवंत उदाहरण आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने त्रिवेणी संगमावर पहिले ‘अमृत स्नान’ करणाऱ्या सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो. योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.