दिल्लीमधील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे महाराष्ट्रातील नेते एकत्र आले आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बोलाविलेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र सहकार क्षेत्रासोबतच इतर सर्वच चर्चा होतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इतर चर्चांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हे विषय महत्त्वाचे आहेत.

राज्यपालांच्या इच्छेवर पंतप्रधान निर्णय घेतील

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्र आणि साखर उद्योगामध्ये सुधारणा करायच्या आहेत. त्यासंबंधीची आज चर्चा होणार आहे. सहकार क्षेत्राची बैठक होत असताना राज्यातील इतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे किंवा इतर कोणत्याही पक्षातील नेत्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भूमिका नाही. सहकार क्षेत्रासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. तसेच राज्यपालांच्या राज्य सोडण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांच्या इच्छेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.’

हे ही वाचा >> “प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक हरले, आता त्यांना…”, फडणवीसांनी सांगितलं युतीचं कारण

आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलत असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. एका मंत्र्यांवर अनेक खात्याची जबाबदारी आहे, अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. विशेषतः अधिवेशन काळात विधानसभा आणि विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्र्यांची बरीच धावपळ होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास चांगलेच होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना संजीवनी मिळणार

आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सुरुवातील बैठक झाल्यानंतर अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची स्थिती, सहकारी कारखान्यांचे नवे धोरण ठरविण्यासाठीची चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. सहकाराचे नवे धोरण केंद्र सरकार आणणार आहे, त्याबाबतची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीच भाजपामधील सहकार क्षेत्राचे नेते रणजीतसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.