Maharashtra vs Pakistan GDP: पहलगाममध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. यादरम्यान भारताने केलेल्या प्रत्युतरात्मक कारवाईनंतर पाकिस्तानने नमती भूमिका घेत शस्त्रविराम मान्य केला.

अशात आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच १९५८ पासून २४ व्यांदा आयएमएफ ने पाकिस्तानला सावरण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. पण, या आर्थिक मदतीनंतरही पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची अवस्था बिकटच आहे. विशेषतः आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या प्रमुख भारतीय राज्यांचा जीडीपी पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १० पट मोठी

आयएमएफच्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानची अर्थव्यवस्था २.६% ने वाढली आहे, त्यांचा जीडीपी अंदाजे ३७३.०८ अब्ज डॉलर्स इतका आहे. राजकीय अस्थिरता, उच्च चलनवाढ आणि आंतरराष्ट्रीय कर्जे यासारख्या वारंवार येणाऱ्या समस्या पाकिस्तानच्या विकासाला आणखी गाळात ढकलत आहेत.

दरम्यान, भारताचा जीडीपी सातत्याने वाढत आहे आणि तो पाकिस्तानच्या वाढीच्या जवळपास १० पट जास्त आहे. खरं तर, सध्याच्या संदर्भात, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०२५ साठी भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.४% होती आणि सध्या जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे.

महाराष्ट्र आणि तामिळनाडूची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा मोठी

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या भारतातील महत्त्वाच्या राज्यांचा जीडीपी आता पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठा आहे.

महाराष्ट्राचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) ४२.६७ लाख कोटी रुपये आहे आणि तामिळनाडूचा जीएसडीपी ३१.५५ लाख कोटी रुपये आहे.

महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे दोन्हीही देशातील प्रमुख औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह केंद्र आहेत जिथे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. ‘मेड इन इंडिया’वर पुन्हा लक्ष केंद्रित केल्याने या राज्यांमध्ये जीडीपी वाढीला आणखी चालना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानची संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

आर्थिक आव्हाने असूनही, पाकिस्तान संरक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. आर्थिक वर्ष २०२५ साठी, पाकिस्तानने त्यांचे संरक्षण बजेट १६.४% टन वाढवून अंदाजे ६०,६५५ कोटी रुपये केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानने २०१९ ते २०२३ दरम्यान लष्करी आयातीपैकी जवळपास ८२% आयात चीनमधून केली आहे.