महाराष्ट्र-कर्नाटक वाद मागील काही दिवसांपासून उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितला होता. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यातच महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून चर्चा केली होती. मात्र, यानंतरही मुख्यमंत्री बोम्मई यांनी अडमुठेपणाची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी गृहमंत्री शाह यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी बोम्मईंनी विचारले असता ते संतापले. म्हणाले, “कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी बोलणं झालं आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच, अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही,” असे ठामपणे बोम्मईंनी सांगितलं.

हेही वाचा : राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया

“नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती देत बोम्मई यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे,” असंही बोम्मई यांनी सांगितलं.

हेही वाचा : मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांची अमित शाहांशी काय चर्चा?

बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांना फोन केला होता. “अमित शाहांनी फोनवरून चर्चा करून, सर्व परिस्थिती मांडली. विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं, योग्य नाही, हे लक्षात आणून दिलं. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनी मला आश्वासित केलं हल्ले होणार नाही. मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे, की त्यांनीही यामध्ये लक्ष घालावं आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं की अशाप्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ले होणं अतिशय चुकीचं आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे.