कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील ४० गावांवर आपला दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमावाद उफाळून निघाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगत असताना महाराष्ट्र सरकार काहीच भूमिका घेत नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देण्याची योजना आखली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची सीमाप्रश्न सोडवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कायदेशीर पथकासह बेळगाव दौरा आयोजित केला आहे. हे दोन्ही मंत्री बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.

हेही वाचा- VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या दौऱ्याबाबत बोम्मई यांनी मोठं विधान केलं आहे. “महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल गोष्ट नाही. बेळगावसंदर्भातील महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली आहे. असं असूनही हे दोन मंत्री बेळगावला भेट देत आहेत. याआधीच आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे पत्र लिहिले आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही मंत्र्यांनी बेळगावला भेट देणं अनुकूल नाही. त्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी आम्ही त्यांच्याशी आधीच संपर्क साधला आहे. पण तरीही ते बेळगावात आले तर कर्नाटक सरकारची पूर्वीची भूमिका कायम राहील,” असा इशारा बोम्मई यांनी दिला. ते बेळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.