महात्मा गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाले होते व या संस्थेचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना भेटण्याची त्यांची इच्छा होती, असा दावा दांडी कुटीर येथे दाखवण्यात आलेल्या बहुमाध्यम कार्यक्रमात करण्यात आला. रा.स्व.संघाच्या कामकाजास गांधीजींचा पाठिंबा होता, असेही त्या बहुमाध्यम फितीत म्हटले आहे.
दांडी कुटीर या ४१ मीटर उंच व ९० मीटर व्यासाच्या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले होते. त्या वेळी गुजरात सरकारने असे सांगितले की, दांडी कुटीर हे एखाद्या व्यक्तीच्या नावाने उभारलेले सर्वात अत्याधुनिक संग्रहालय आहे. मोदी यांनी या संग्रहालयाची संकल्पना मांडली होती. बहुमाध्यम चित्रफितीत गांधीजींनी वर्धा येथे १९३० मध्ये रा.स्व.संघाच्या शिबिरास भेट दिल्याचे सविस्तर वर्णन आहे. रा.स्व.संघाच्या ‘साधना’ या अंकाचे माजी संपादक विष्णू पंडय़ा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, हे वर्णन या बहुमाध्यम फितीत समाविष्ट करण्यात आले. मात्र या बहुमाध्यम फितीच्या आशय समितीत कुणीही गांधीवादी व्यक्ती नाही. त्यात म्हटले आहे की, गांधीजींनी घनश्यामदास बिर्ला यांच्या समवेत रा.स्व.संघाच्या शिबिरास भेट दिली होती व तेथील कार्यपद्धतीने ते प्रभावित झाले होते व त्यांनी संघाचे संस्थापक हेडगेवार यांना भेटवण्याची इच्छा व्यक्त केली होती. नंतर गांधीजी दुसऱ्याच दिवशी हेडगेवार यांना भेटायला गेले होते, असा दावा पंडय़ा यांनी केला आहे. मुंबईच्या लाइव्ह पिक्सेल या कंपनीला ही बहुमाध्यम फीत तयार करण्याचे कंत्राट दिले होते. शापूरजी पॅलोनजी इंजिनीअरिंग अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीने हे संग्रहालय उभारले आहे. शापूरजी यांनी असा दावा केला की, दांडी कुटीर आम्ही सात महिन्यांत उभे केले आहे.