उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्त्यव्यानंतर सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेक महिला नेत्यांनाही या वक्तव्यावर टीका केली असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांसहीत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे.
महुआ यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री रावत यांनीच केलेलं वक्तव्य पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधालाय. “उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले, खाली पाहिलं तेव्हा गमबुट होते. वर पाहिलं तर… एनजीओ चालवता आणि कपडे गुडघे फाटलेले घालता. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जेव्हा पाहिलं तेव्हा वर, खाली, पुढे, मागे सगळीकडे आम्हाला केवळ एक निर्लज्ज माणूस दिसला. एका राज्याची धुरा तुमच्या हाती आहे मात्र मेंदू फाटका आहे तुमचा,” अशा शब्दांमध्ये महुआ यांनी मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.
Uttarakhand CM :
“Jabh nichey dekha toh gumboot the.. aur upar dekha toh …. NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”CM saab- jabh apko dekha toh upar neeche aagey peechey humein sirf besharm behuda aadmi dikhta hai
State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर स्वत:चा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या रिप्ट म्हणजेच फाटक्या वाटणाऱ्या जीन्ससंदर्भात वक्तव्य केलं तशीच जीन्स घातलेला स्वत:चा फोटो प्रियंका यांनी पोस्ट केलाय. “रिप्ट जिन्स आणि पुस्तक. देशातील संस्कृती आणि संस्कारांना अशा पुरुषांपासून धोका आहे जे महिलांना आणि त्यांनी निवडलेल्या गोष्टींवरुन त्यांच्याबद्दलचं मत तयार करतात. मुख्यमंत्री रावतजी तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे देश बदलेल,” असा टोला प्रियंका यांनी लगावला आहे.
Ripped Jeans aur Kitab.
The country’s ‘sanskriti’ & ‘sanskaar’ are impacted by men who sit and judge women and their choices. Soch badlo Mukhyamantri Rawat ji, tabhi desh badlega. #RippedJeansTwitter pic.twitter.com/qYXcN88fY6— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 18, 2021
तीरथ सिंह रावत काय म्हणाले होते?
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.
रावत यांनी सांगितला तो अनुभव
मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते,” असं रावत म्हणाले. पुढे बोलताना रावत म्हणाले,”माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असंही रावत यांनी यावेळी म्हटलं.