Mahua Moitra vs Kalyan Banerjee Conflict in TMC : तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार महुआ मोइत्रा व खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. मोइत्रा यांनी एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केला होता. त्यामुळे बॅनर्जी मोइत्रा यांच्यावर संतापले आहेत. बॅनर्जी यांनी मोइत्रा यांचे शब्द अमानवीय असल्याची टिप्पणी केली आहे.
महुआ मोइत्रा यांच्यावर पलटवार करताना कल्याण बॅनर्जी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये महुआ मोइत्रा यांनी माझ्याबद्दल केलेल्या काही प्रतिक्रिया ऐकल्या. माझ्याबद्दल बोलताना त्यांनी ज्या शब्दांची निवड केलीय ती निवड आक्षेपार्ह आहे. त्यांनी आपल्या सहकारी खासदाराची डुकराशी तुलना करण्यासारखी अमानवीय भाषा वापरली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्यांनी सुसंस्कृत संवादाच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केलं आहे.
वादाची सुरुवात कुठून झाली?
कृष्णानगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी इंडिया टूडेशी एका पॉडकास्टच्या माध्यमातून बातचीत केली. महुआ मोइत्रा यांनी अलीकडेच पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाबद्दल कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या टिप्पणीवर मोइत्रा यांनी पॉडकास्टमध्ये बोलताना खेद व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या होत्या की “तुम्ही डुकराबरोबर कुस्ती करू शकत नाहीत. तुम्ही चिखलात लोळावं अशी डुकराची इच्छा असते. तुम्ही डुकरासारखे घाणीत लोळलात तर ते आनंदी होतं. भारतात महिलांचा तीव्र द्वेष करणारे, लैंगिकदृष्ट्या निराश व भ्रष्ट पुरूष खूप आहेत. वेगवेगळ्या पक्षांकडून ते संसदेत प्रतिनिधीत्व करत आहेत.”
कल्याण बॅनर्जी काय न्हणाले?
महुआ मोइत्रा यांनी केलेल्या वक्तव्यावर कल्याण बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार बॅनर्जी म्हणाले, “जे लोक प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करतात, त्यांनी एकदा तरी विचारमंथन करावं की ते नेमकं कुठल्या प्रकारचं राजकारण करत आहेत. या अशा वक्तव्यामुळे ही मंडळी आतून किती पोकळ आहे ते समोर येतं. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी शिवीगाळ करू लागते, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून प्रत्युत्तर देऊ लागतो, अश्लील व्यंगाच्या माध्यमातून उत्तर देऊ लागतो तेव्हा ती त्याची ताकद नसते तर त्याच्या असुरक्षिततेची भावना त्याला असं करायला भाग पाडते.”