वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेत ट्रिलियन डॉलरच्या करसवलतीचे पॅकेज सादर करणाऱ्या विधेयकाला रात्रभराच्या चर्चेनंतर गुरुवारी मंजुरी देण्यात आली. या विधेयकावर २१५-२१४ असे मतदान झाले आणि एका मताच्या फरकावर रिपब्लिकन पक्षाने या विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकामुळे विविध ठिकाणी करसवलतींबरोबरच काही ठिकाणी सुविधा पुरविण्यावर आखडता हात घेण्यात आला आहे. आता हे विधेयक सीनेटमध्ये जाईल.
हे विधेयक मंजूर करण्यासाठी अमेरिकी जनतेने आम्हाला संसदेत पाठविल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली, तर डेमोक्रॅटिक पक्षाने या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. एका हजारहून अधिक पानांचे हे विधेयक आहे. हे विधेयक मंजूर झाले नाही, तर लोकांचा विश्वासघात केल्यासारखे होईल, असे सत्ताधारी पक्षाच्या गटांनी मतदानापूर्वी म्हटले होते.
या विधेयकानुसार साडेचार ट्रिलियन अमेरिकी डॉलरची विविध ठिकाणी करसवलत देण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारामध्ये रिपब्लिकन पक्षाने अशा सवलतीचे आश्वासन दिले होते. टिप्स देणे, ओव्हरटाइम वेतन, कारसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज यांच्यावर या नव्या विधेयकातील तरतुदींनुसार कुठलाही कर द्यावा लागणार नाही. यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्याकीय मदत आणि अन्न कार्यक्रमांवरील खर्च कमी करण्याचा अमेरिकी प्रशासनाचा विचार आहे.