पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नोटाबंदीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. गुरूवारी त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना स्विस बँकेतून काळा पैसा आणता आला नाही. पण आज सामान्य लोकांच्या कष्टाच्या पैशासाठी मात्र त्यांनी अडचणी निर्माण केल्या आहेत, अशी टीका करत सर्वसामान्यांमध्ये हिटलरपेक्षाही मोदींची दहशत जास्त असल्याचा आरोपही केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

देशात सध्या तुघलकी कारभार सुरू असून कर भरणाऱ्यानांच त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास प्रतिबंध लादण्यात आला आहे. यांच्या कारभारात हिटलरशाहीपेक्षा जास्त गडबड दिसत असल्याचा संशयही व्यक्त केला.

बुधवारी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित मोर्चातही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला होता. मोदी सरकारकडून देशात पुन्हा एकदा संरजामशाही लागू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांच्या या धोरणामुळे सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाल्याची टीका त्यांनी केली होती. या सरकारने विश्वासहर्ता गमावली आहे. एकदा विश्वासहर्ता गमावल्यानंतर तुमच्या हाती काहीच नसते. सत्तेवर येताच माणसाचे कान
आणि डोळे बंद होतात असे म्हणतात. आज भाजपचीही तीच अवस्था झाली असून त्यांना सर्वसामान्यांचे दु:ख दिसत नसल्याचा टोला लगावला होता. जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. देशातील बहुतांश उद्योग ठप्प झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांकडे पैसे नाहीत. त्यांच्या खाण्याचेही वांदे झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत असतानाच सरकारने हा निर्णय घेऊन संपूर्ण चित्रच बदलवले असल्याचा आरोप केला होता.