पीटीआय, कोलकाता

ओदिशाच्या बालासोर येथे झालेला भीषण रेल्वे अपघात हा या शतकातील सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला. या अपघातामागील सत्य बाहेर येण्यासाठी योग्य तपासाची गरजही त्यांनी व्यक्त केली. दोन वेळा रेल्वेमंत्रिपद भूषवणाऱ्या ममता यांनी घटनास्थळी भेट दिली व मदतकार्याची पाहणी केली. शनिवारी दुपारी त्या अपघातस्थळी पोहोचल्या. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ममता यांनी सांगितले, की जर हा या शतकातील सर्वात भीषण रेल्वे अपघात असेल तर त्याचा योग्य तऱ्हेने तपास होण्याची आवश्यकता आहे. या दुर्घटनेमागे नक्कीच काही तरी चुकीचे घडले आहे. त्यामागील सत्य जगासमोर आले पाहिजे. रेल्वेगाडय़ांची धडक रोखणारी यंत्रणा काम का करू शकली नाही, याचे कारण शोधले पाहिजे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याची घोषणाही ममता यांनी यावेळी केली. त्यांनी रेल्वे आणि ओदिशा सरकारलाही अपघातग्रस्तांना पुरेशी मदत देण्याचे आवाहन केले. पश्चिम बंगाल सरकारने ७० रुग्णवाहिका, ४० वैद्यकीय तज्ज्ञ आणि परिचारिकांचे पथक पाठवले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.