Pro-Pak slogan in Indore: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला असताना भारतात काही ठिकाणी पाकिस्तानचे समर्थन करण्यात आले. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा आणि सोशल मीडियावर कमेंट केल्या गेल्या. विविध राज्यात घडलेल्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच मध्यप्रदेशच्या इंदूर येथे एका कंत्राटी कामगाराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
इंदूरच्या गांधी नगर परिसरात सदर घटना घडली. पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर करणी सेनेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. करणी सेनेने आरोपीला शोधून काढले आणि पाकिस्तानचे समर्थन केल्याबद्दल मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.
अटक झालेल्या आरोपीचे नाव मोहम्मद जावेद असे आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जावेद आणि त्याचे दोन मित्र घरात बसल्याचे दिसून येत आहे. एक जण कलिंगड कापत आहे. तर त्यावेळी एकजण पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देत भारताविरोधात विधान करतो. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. त्यानंतर करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला शोधून काढले.
पोलिसानी जावेदच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून इतर दोघांचा शोध सुरू केला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही इतर आरोपींचा कसून शोध घेत आहोत. अटक केलेल्या आरोपीकडे तीन ओळखपत्र आढळून आले आहेत. त्याच्याकडे दोन आधार कार्ड आहेत. एकाच नावाचे दोन आधार कार्ड त्याने कसे मिळवले याची चौकशी सुरू आहे.
उत्तर प्रदेशमधूनही एकाला अटक
उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका व्यक्तीनेही १२ मे रोजी फेसबुकवर पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच पाकिस्तानचा ध्वज फडकवला होता. हा व्हिडीओदेखील व्हायरल झाल्यानंतर बरेलीमधील वातावरण तापले होते. अखेर पोलिसांनी मोहम्मद साजिद नामक आरोपीला अटक केली.
पुण्यातील विद्यार्थीनीवर कारवाई
पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थीनीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशी कमेंट केली होती. यानंतर सदर विद्यार्थीनीला पुणे शहर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केल्यानंतर विद्यार्थीनीने पाकिस्तान जिंदाबादची कमेंट केली होती. यानंतर कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे राहत असलेल्या विद्यार्थीनीला अटक करण्यात आली.