१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात या वृद्धाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या मुलाला हा संशय होता की आपले वडील काळी जादू करतात. त्यामुळे या मुलाने वडिलांवर नजर ठेवण्यासाठी घरात गुपचूप कॅमेरा सेट केला होता. त्यात या कथित अत्याचाराचं रेकॉर्डिंग असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीच्या ४० वर्षीय मुलाने हा व्हिडीओ पीडितेच्या वडिलांनाही पाठवला. त्यानंतर लगेचच पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी मुलावरही आयटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या वडिलांना एका शेजाऱ्याने पोलीस तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. २० ते ३० एप्रिल दरम्यान ही घटना घडली. मोबाईलमध्ये कॅमेराचं रेकॉर्डिंग आरोपीचा मुलगा तपासत होता तेव्हा ही घटना त्याला दिसली. पीडिता ही त्याच्या शेजारी राहणारी मुलगी आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने लगेच हा व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवला. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना २० ते ३० एप्रिलच्या दरम्यान घडली आहे. आरोपी आणि पीडित मुलीचं कुटुंब यांच्यात जवळचे संबंध होते. आरोपीने याआधीही तिचा लैंगिक छळ केला आहे असंही समजलं आहे. एप्रिल महिन्यात या वृद्धाने पीडितेला घरी बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केला असंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.