मणिपूरमध्ये तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. कारण मेईतेई संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं अपहरण केलं आहे. इंफाळ पूर्व भागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांचं अपहरण करण्यात आल्याने मणिपूरमध्ये तणाव वाढला आहे. मणिपूर पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जलद कारवाई करत सुटका केली.
नेमकी काय घटना घडली?
अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगगोलशी संबंधित २०० शस्त्रधारी लोक त्यांच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी तोडफोड केली. इतकंच नाही तर गोळीबार करत मोठं नुकसानही केलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरमध्ये तणाव वाढला असल्याने लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच इम्फाळ पूर्व येथे आसाम रायफल्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेचा निषेध नोंदवत पोलिसांनी शस्त्रंही खाली ठेवल्याची माहिती आहे. यासंबंधीचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.