देशभर पडसाद : सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाक् युद्ध

वृत्तसंस्था, इम्फाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराची आणखी एक घृणास्पद घटना शनिवारी उघडकीस आली. याही घटनेत जमावाने २१ आणि २४ वर्षे वयाच्या दोन कुकी-झोमी आदिवासी तरुणींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्यांची हत्या केली होती.  दरम्यान, मणिपूरमधील महिला अत्याचारावरून शनिवारी भाजप आणि विरोधी पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप युद्ध तीव्र झाले.  

भाजपने पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करून विरोधकांच्या कथित मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर मणिपूरवरून लक्ष वळवण्याची भाजपची ही नीती असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. तसेच विरोधी पक्षांचे खासदार सोमवारी संसदेच्या आवारातील गांधी पुतळय़ासमोर आंदोलनही करणार आहेत.  

आणखी दोन कुकी-झोमी तरुणींच्या मृत्यूप्रकरणी १६ मे रोजी कांगपोकपी या त्यांच्या मूळ जिल्ह्यातील सायकूल पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल (झिरो एफआयआर) नोंदवण्यात आला होता. एका तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून खून, बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. या तरुणी इम्फाळ पूर्वेकडील एका गॅरेजमध्ये मोटारी धुण्याचे काम करीत होत्या. ५ मे रोजी त्या राहत असलेल्या भाडय़ाच्या घरात सुमारे १०० ते २०० हल्लेखोरांनी त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या केली, अशी नोंद पोलिसांनी ‘एफआयआर’मध्ये केली होती.

दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याच्या घटनेच्या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल होण्याच्या दोन दिवस आधी, त्याच पोलीस ठाण्यात आणखी दोन महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेप्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यात आला होता. मात्र हा गुन्हा इम्फाळ पूर्वेच्या संबंधित पोलीस ठाण्यात हस्तांतरित होण्यास एक महिन्याहून अधिक कालावधी लागला होता. तर आता, गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तक्रार दाखल करणाऱ्या संबंधित कुटुंबाला त्याबाबतच्या तपासातील प्रगतीची माहिती नसल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.

‘झिरो एफआयआर’

गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात घडला याचा विचार न करता कोणत्याही पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ दाखल केला जाऊ शकतो. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या वेळी असे अनेक ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आले होते.  कारण अनेक कुटुंबे हिंसाचारामुळे परागंदा झाली होती. तसेच त्यांचे नातलग जखमी झाले होते किंवा मारले गेले होते.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते राजस्थान, पश्चिम बंगालमधील गुन्ह्यांबाबत मौन बाळगतात. गेल्या चार वर्षांत राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या एक लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे, लैंगिक अत्याचाराशी संबंधित ३३ हजार गुन्हे घडले आहेत. – अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री

गुजरातमध्ये आज आदिवासींचा बंद

अहमदाबाद : मणिपूर येथील महिलांवरील अत्याचार आणि गुजरातमध्ये आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्याच्या आदिवासीबहुल पट्टय़ात आज, रविवारी बंद पाळण्यात येणार आहे. आदिवासी एकता मंच या संघटनेसह अनेक आदिवासी संघटनांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून गुजरात प्रदेश काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

‘बंगालमध्येही महिलांना विवस्त्र करून मारहाण’

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माल्दा जिल्ह्यात गेल्या बुधवारी एका जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर हल्ला केला होता, असा दावा भाजपने शनिवारी केला. जमाव महिलांना निर्दयपणे मारहाण करीत असल्याची कथित चित्रफित शनिवारी भाजपच्या ‘आयटी सेल’चे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर प्रसारित केली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने हा दावा फेटाळत, भाजपचा हा दावा म्हणजे ‘लक्ष वळवण्याचा डावपेच’ असल्याचा आरोप केला.

धिंडप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी १९ वर्षे वयाच्या पाचव्या आरोपीला शनिवारी अटक केली. या अमानुष घटनेची चित्रफित बुधवारी उघडकीस आली होती. यापूर्वी अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजस्थान, बंगालमध्येही अत्याचार : भाजपचा दावा

नवी दिल्ली : भाजपने राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहार या विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमधील महिलांवरील कथित अत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधले. राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील महिलांवरील अत्याचारांची यादी मोठी आहे, परंतु मणिपूरच्या घटनेवर विरोधक राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपने केला.

 ‘आरोपींना फाशी द्या’

मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करणारे नराधम हे मानवतेवर कलंक असून, त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या एका माजी सैनिकाच्या पत्नीवरही अत्याचार झाला, ही गंभीर बाब आहे, असे हजारे म्हणाले.

विरोधी खासदारांचे उद्या आंदोलन

मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावे या मागणीसाठी विरोधी पक्षांचे खासदार सोमवारी संसद संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ निदर्शने करणार आहेत. ‘इंडिया’ या विरोधी आघाडीतील घटक पक्षांचे खासदार त्यात सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिझोराममधील मैतेईंचे सुरक्षिततेसाठी स्थलांतर

गुवाहाटी : पूर्वाश्रमीच्या एका अतिरेकी संघटनेच्या इशाऱ्यानंतर मिझोराममध्ये राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या मैतेई नागरिकांनी शनिवारी आपल्या सुरक्षिततेसाठी राज्य सोडण्यास सुरुवात केली. मिझोराम आता मैतेईंसाठी सुरक्षित राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी राज्य सोडून जावे, असा आदेशच ‘पीएएमआरए’ या संघटनेने दिला होता.