तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलणार; २ जी घोटाळा खटल्याचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या पराभवास २ जी आणि कोळसा हे दोन घोटाळे मुख्यत्वे जबाबदार ठरले होते. यापैकी २ जी घोटाळ्यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने काँग्रेसवर बसलेला ठपका दूर झाला आहे. काँग्रेसबद्दल निर्माण झालेली भ्रष्ट प्रतिमा दूर होण्यास या निकालाने मदतच होणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणावर या निकालाचा मोठा परिमाण होणार असून, गेले सात वर्षे सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोपांचा सामना कराव्या लागलेल्या द्रमुकला दिलासाच मिळाला आहे.

काँग्रेसच्या मागे २ जी आणि कोळसा घोटाळा हे दोन मोठे ठपके बसले होते. २ जी घोटाळ्यात काँग्रेसने तेव्हा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असता सामान्य जनतेने काँग्रेसचा युक्तिवाद मान्य केला नव्हता. २ जी घोटाळ्याचे भूत काँग्रेसच्या डोक्यावर कायम होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर या दोन घोटाळ्यांचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला. भाजपने याच मुद्दय़ावर काँग्रेसला लक्ष्य केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, त्यानंतर झालेली निर्माण झालेली लोकभावना यातून काँग्रेसची प्रतिमा भ्रष्ट अशी झाली होती. २ जी घोटाळ्यातील निकालाने काँग्रेसला दिलासाच मिळाला आहे.

दोनच दिवसांपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला अनपेक्षितपणे चांगले यश मिळाले. भाजपला रोखण्यात यशस्वी झाल्याचा काँग्रेसला अधिक आंनद झाला होता. यापाठोपाठ २ जी घोटाळ्याचा निकाल लागल्याने काँग्रेसच्या गोटात साहजिकच उत्साहाचे वातावरण आहे. ‘भाजप आणि  ‘कॅग’चे तत्कालीन प्रमुख विनोद राय यांनी काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती केली होती. न्यायालयाच्या निकालाने सत्य समोर आले आहे. विनोद राय आणि भाजपचा फुगा फुटला आहे’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदिपसिंग सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

द्रमुकला ‘अच्छे दिन’

तमिळनाडू्च्या २०११च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २ जी घोटाळा उघडकीस येणे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची कन्या कानिमोझी आणि माजी मंत्री राजा यांना झालेल्या अटकेमुळे द्रमुकला मोठा फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा दारुण पराभव झाला होता. पुढे सातत्याने द्रमुकवर भ्रष्टाचाराचा आरोप व्हायचा. तमिळनाडूमध्ये आलटून पलटून सत्ताबदल होण्याची तीन दशकांची परंपरा २०१६च्या निवडणुकीत खंडित झाली. जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला पुन्हा सत्ता मिळण्यात द्रमुकवरील भ्रष्टाचाराचा आरोप हा सुद्धा कारणीभूत ठरला होता.

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची झालेली शकले, द्रमुकचा वाढता जोर हे लक्षात घेता भाजपने दोन्ही पक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तमिळनाडूतील ३९ खासदारांची संख्या लक्षात घेता भाजपला या राज्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरूनच अण्णा द्रमुकमधील दोन गटांचे एकत्रीकरण आणि शशिकला यांची हकालपट्टी करण्यात आली. तरीही अण्णा द्रमुकला यश मिळण्याबाबत साशंकता आहे. अलीकडेच तमिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या चौकशीची विचारपूस केली होती. पुढे मागे द्रमुकने भाजपला साथ द्यावी हे त्यामागचे गणित आहे. काझिमोझी आणि राजा हे निर्दोष सुटल्याने द्रमुकवरील भ्रष्टाचाराचा डाग पुसला गेला आहे. राजकीय हवा बघून द्रमुकचे नेते भाजपलाही साथ देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on g spectrum scam part
First published on: 22-12-2017 at 02:23 IST