वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राजधानीच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ पोहोचविणारे आणि रुजविणारे शेफ मच्छिंद्र कस्तुरे यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. राष्ट्रपती बनल्यानंतर प्रतिभाताई पाटील यांनी कस्तुरे यांना सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात आणले. त्यांच्यामुळेच तब्बल २५० वर्षांनंतर दिल्लीतील सर्वोच्च राजकीय इमारतीमध्ये, अर्थात राष्ट्रपती भवनात पुन्हा महाराष्ट्रीय पदार्थाचा गंध दरवळू लागला.
आमटी, पुरणपोळी हे पदार्थ कस्तुरे यांच्यामुळे पुन्हा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चवीने खाल्ले जाऊ लागले. प्रतिभाताई पाटील यांच्यापूर्वीचे सर्व राष्ट्रपती आपला शेफ बरोबर घेऊन येत असत. मात्र, प्रतिभाताईंनी त्यावेळी भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या सेवेत असलेल्या कस्तुरे यांना आपला मुख्य शेफ बनविले. संपूर्ण शाकाहारी असलेल्या प्रतिभाताईंच्या परदेश प्रवासातही कस्तुरे त्यांच्याबरोबर जात आणि आपल्या राष्ट्रपतींच्या आहाराची काळजी घेत असत. कस्तुरे यांच्या देखरेखीखाली प्रतिभाताईंनी राष्ट्रपती भवनाचे स्वयंपाकघर अत्याधुनिक केले.
प्रणव मुखर्जी राष्ट्रपती बनल्यानंतर एकदा स्वीडनच्या दौऱ्यावरून परतले आणि त्यांनी कावीरपासून (एका प्रकारच्या शार्क माशाची अंडी) तयार झालेले पदार्थ खाण्याचा मनोदय व्यक्त केला. दिल्लीमध्ये कावीर मिळणे प्रचंड अवघड होते. मात्र, कस्तुरे यांनी त्याची व्यवस्था केली आणि सकाळच्या नाश्त्याला कावीरचे तीन वेगवेगळे पदार्थ प्रणवदांसमोर सादर केले. त्यांच्या पाककलेवर खूष झालेल्या मुखर्जीनी नंतर आठवडाभर कावीरचेच पदार्थ करण्याची फर्माईश केली आणि कस्तुरे यांना आपल्या सेवेत कायम ठेवले. कस्तुरे यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी दिल्ली दरबारी पोहोचविलेल्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाची चव राजधानीच्या जिभेवर कायम राहणार आहे.