लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यासाठी अनेक दशकांपासून लढणाऱ्या व्हेनेझुएलाच्या विरोधी कार्यकर्त्या मारिया कोरिना मच्याडो यांना २०२५ या वर्षासाठी नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. ओस्लो येथे शुक्रवारी नोबेल समितीने ही घोषणा केली. जगातील अनेक युद्धे आपणच थांबविल्याचा दावा करत या पुरस्कारासाठी आग्रही असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग झाला असून, अमेरिकेने थयथयाट सुरू केला आहे.
‘व्हेनेझुएलातील लोकशाही चळवळीच्या नेत्या म्हणून मारिया कोरिना मच्याडो अलीकडच्या काळातील लॅटिन अमेरिकेमधील नागरी धैर्याचे सर्वांत मूर्तिमंत उदाहरण आहेत,’ असे नॉर्वेजियन नोबेल समितीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी यावर्षी ३३८ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यामध्ये २२४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. परंतु व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देणे, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना २०२५ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या मारिया मच्याडो यांनी राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सरकारविरुद्ध एकेकाळी विभाजित असलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणले. याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत होते, असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन व्हॅट्ने फ्रिडनेस म्हणाले. गेल्यावर्षी मच्याडो यांना लपून राहावे लागले होते. त्यांच्या जिवाला गंभीर धोका असूनही, त्या देशातच राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांची घोषणा झाल्याने लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. पुरस्काराच्या घोषणेपूर्वीच नोबेल समिती मच्याडो यांच्यापर्यंत पोहोचू शकली हे आश्चर्यकारक होते, असे फ्रिडनेस म्हणाले.
गेल्यावर्षी माच्याडो आणि त्यांच्या सहयोगी एडमुंडो गोंझालेझ यांना युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार सन्मान ‘सखारोव्ह पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नोबेल शांतता पुरस्कार जिंकणाऱ्या मच्याडो २० व्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान, ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार नाकारल्यानंतर अमेरिकेने नोबेल समितीवर टीका केली. नोबेल पारितोषिक समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचा आरोप व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
‘अध्यक्ष ट्रम्प जगभरात शांतता करार करत राहतील, युद्धे संपवतील आणि जीव वाचवतील. त्यांच्यासारखी व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वतही हालवू शकते. नोबेल समितीने हे सिद्ध केले की ते शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य देतात. – स्टीव्हन च्युंग, ‘व्हाइट हाऊस’चे प्रवक्ते
हा पुरस्कार सर्व व्हेनेझुएलातील नागरिकांचा संघर्ष आहे. आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. स्वातंत्र्य मिळवणे आणि लोकशाही साध्य करण्यासाठी आपले मुख्य सहयोगी म्हणून आपण अध्यक्ष ट्रम्प, अमेरिका, लॅटिन अमेरिकेतील नागरिक आणि जगातील लोकशाही राष्ट्रांवर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवतो. – मारिया कोरिना मच्याडो, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या