ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते. याबाबत नवी माहिती समोर येत आहे. कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्विटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, असं वृत्त ‘सीएनएन’नं दिलं आहे. “ट्विटरला भक्कम स्थितीत आणण्यासाठी आम्ही नोकरकपातीच्या कठिण प्रक्रिेयेतून आज जात आहोत”, असा ईमेल कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. या प्रक्रियेदरम्यान कार्यालयं तात्पुरती बंद राहणार आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे बॅजही काही काळासाठी निलंबित करण्यात येणार आहे, असाही उल्लेख या ईमेलमध्ये आहे. कर्मचारी, ट्विटरच्या यंत्रणांसह ग्राहकांच्या मजकुराच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत असल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरमधून तीन हजार ७०० नोकऱ्यांची कपात करण्याची योजना आखली आहे, असे वृत्त गुरुवारी ‘ब्लुमबर्ग’नं दिलं होतं. या कंपनीतून काढल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांच्या पगाराएवढा ‘सेवरन्स पे’ दिला जाऊ शकतो, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. दरम्यान, कुठूनही काम करण्याची (Work from Anywhere) कंपनीची योजनाही बंद करण्याच्या तयारीत मस्क असल्याचे बोलले जात आहे.
ट्विटरचे मालकी हक्क मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे.
