जगातील सर्वात उंच इमारत म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाजवळ रविवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बुर्ज खलिफाच्या परिसरात धूराचे लोट दिसत आहेत.
दुबईतील शॉपिंग मॉलच्या बाजूला एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीमध्ये रविवारी आग लागली. आग वेगाने पसरत असल्याने सुरुवातीला भीतीचे वातावरण होते. पण दुबईतील अग्निशमन दलाच्या पथकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले आणि पुढील अनर्थ टळला. आगीमुळे संपूर्ण परिसरात धूराचे लोट दिसून आले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल असे दुबईतील अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या इमारतीमध्ये आग लागली ती इमारत इमार प्रॉपर्टीजची आहे. या बांधकाम समुहाच्या इमारतीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. दुबईतील पत्रकार अहमद रसूल यांनीदेखील या आगीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
https://twitter.com/AhmadRasoul/status/848376959126188032
इमार प्रॉपर्टीजच्या मालकीच्या दुबईतील ‘द अॅड्रेस’ या ६३ मजली आलिशान हॉटेलमध्ये ३१ डिसेंबर २०१५ रोजी आग लागली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्टीदरम्यान हा अग्नितांडव झाला होता. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पण हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.