हत्येचा आरोप, त्यानंतर कायद्याची पदवी आणि स्वतःच वकिली करून आरोपातून मुक्तता… एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सीरिजला शोभेल अशी ही कथा वाटते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये हे वास्तवात घडले आहे. मेरठच्या एका युवकाला १२ वर्षांपूर्वी खूनाच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. त्यावेळी त्याचे वय फक्त १८ वर्ष होते. मेरठमध्ये दोन पोलिस शिपायांच्या हत्येबद्दल अमित चौधरी या युवकाला आरोपी करण्यात आले. तो गँगस्टर असल्याचा आरोप ठेवला गेला. हत्या झालेले पोलिस शिपाई असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि अमित चौधरी चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात गेला. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले असून अमितच्या संघर्षाची कथा उद्धृत केली आहे.

ज्यावेळी पोलिसांचे हत्याकांड झाले, तेव्हा अमित बहिणीसह परगावी गेला होता. मात्र या प्रकरणातील १७ आरोपींसह त्याचेही नाव गोवण्यात आले. उत्तर प्रदेशमधील कुख्यात कैल गँगचा तो सदस्य असल्याचा आरोप ठेवून त्याच्यावरही हत्या आणि इतर गंभीर कलमे दाखल केली गेली. यामुळे तब्बल दोन वर्ष अमित चौधरीने तुरुंगवासही भोगला. या एका घटनेमुळे अमितचे संपूर्ण भवितव्य अंधकारमय झाले होते. मात्र एका निर्णयामुळे त्याच्या आयुष्याला पुन्हा कलाटणी मिळाली.

संघर्ष करण्याचा निर्धार

हा निर्णय होता परिस्थितीशी संघर्ष करण्याचा. परिस्थिती प्रतिकूल होती, मात्र त्याच्याशी दोन हात करण्याचा निर्धार अमितने केला. स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याने कायद्याचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. तुरुंगात त्याच्यासह इतर अट्टल गुन्हेगार होते, पण त्यांची संगत न धरता केवळ स्वतःला या दलदलीतून बाहेर काढण्यावर त्याने लक्ष केंद्रीत केले. आपला मानस तुरुंग अधीक्षकांना सांगितल्यानंतर त्यांनीही त्याला वेगळ्या बॅरेकची व्यवस्था करून इतर गुन्हेगारांपासून दूर ठेवले.

दोन वर्ष तुरुंगात खितपत पडल्यानंतर २०१३ रोजी अमितला जामीन मिळाला. इथून पुढे अमितचा संघर्ष आणखी तीव्र झाला. हत्येचा आरोपी हा कलंक पुसून काढण्यासाठी एलएलबीला प्रवेश मिळवून अमितने कायद्याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर एलएलएमही यशस्वीरित्या पूर्ण केले. दोन्ही पदव्या मिळवल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाची परिक्षा उत्तीर्ण होऊन सनदही मिळवली. सनद मिळताच, स्वतःच्या खटल्यात युक्तिवाद करण्याचे अमितने ठरविले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमितच्या खटल्याची सुनावणी खूपच धीम्यागतीने सुरू होती. कुणाचेही जबाब व्यवस्थित नोंदविलेले नव्हते. तपासात हलगर्जीपणा झालेला होता. जेव्हा अमितने साक्षीदार, पंचाची उलटतपासणी सुरू केली, तेव्हा तर धक्कादायक बाब समोर आली. तपास अधिकाऱ्याला न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे करून अमितने काही प्रश्न विचारले. पण प्रश्न विचारणाऱ्या अमितला आपण कधीकाळी अटक केली होती, हेच तपास अधिकाऱ्याला माहीत नव्हते. यामुळे न्यायालयालाही अमितच्या निर्दोषत्वाचा अंदाज आला.

खटल्याची सुनावणी बरेच दिवस चालली. त्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात अमित चौधरीसह १३ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. शिपाई कृष्णपाल आणि अमित कुमार यांची हत्या करण्यात आणि त्यांच्या रायफल चोरी करण्यात या लोकांचा काहीही सहभाग नव्हता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

खऱ्या आरोपींना मिळाली शिक्षा

अमित चौधरीचे निर्दोषत्व सिद्ध होत असताना या प्रकरणातील खऱ्या दोषींनाही शासन केले गेले. सुमित कैल, नीटू आणि धर्मेंद्र या आरोपींना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावण्यात आली. मुख्य आरोपी कैल २०१३ रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. हत्या आणि रायफल चोरीच्या प्रकरणी नीटूला जन्मठेप सुनावली गेली. तर धर्मेंद्रला कर्करोगाने पछाडले, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलंक पुसला, पण सैनिक होण्याचे स्वप्न भंगले

अमित चौधरी मोठा संघर्ष करून निर्दोष सुटला. पण लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न मात्र भंगले. अमितने सांगितले की, मी लष्करात जाण्याचे स्वप्न पाहत होतो, त्यासाठी तयारीही सुरू होती. पण २०११ च्या एका रात्रीने माझे आयुष्यच पालटले. अमित म्हणतो की, आता त्याला फौजदारी न्याय प्रक्रियेत पीएचडी करायची आहे. देवाने मला असहाय्य लोकांची मदत करण्यासाठी निवडले असावे. आता माझी नियती हीच आहे. त्यामुळे निर्दोष लोकांना न्याय मिळवून देण्याचा यापुढे प्रयत्न करणार असल्याचे अमित चौधरीने सांगितले.