मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी केंद्र सरकार आणि भाजपा नेतृत्वावर आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. केंद्रावर हल्ला करत, त्यांनी आरोप केला की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा गर्विष्ठ स्वभावात होते. पंतप्रधानांशीही त्यांचा वाद झाल्याचे त्यांनी सांगितले.

हरियाणातील दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमाला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी याबाबत खुलासा केला आहे. ““जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, आपले ५०० लोक मेले आहेत, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मेले आहेत का?, असा प्रतिप्रश्न मला विचारला. मी म्हणालो की, हो तुमच्यासाठीच मेलेत कारण तुम्ही राजे झाला आहात ना. यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले,” असे मलिक म्हणाले. पंतप्रधान म्हणाले आता तुम्ही अमित शहांना भेटा. त्यानंतर मी अमित शहा यांची भेट घेतली, असे मलिक पुढे म्हणाले.

नंतर दादरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांना कृषी कायदे रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांचे मत विचारण्यात आले. “पंतप्रधान आणखी काय बोलू शकतात. आपण (शेतकऱ्यांनी) निर्णय घ्यावा. असे काही करण्यापेक्षा हमीभावासाठी कायदेशीर हमी मिळवण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे,” असे मलिक म्हणाले. अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत. जसे शेतकऱ्यांवरील खटले. सरकारने हे खटले मागे घ्यावेत. त्याचप्रमाणे एमएसपीवर कायदा करण्याची गरज आहे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

अमित शाहांना मोदींबद्दल…; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, याआधीही सत्यपाल मलिक यांनी अनेकवेळा कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, अखेरीस केंद्राला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. जेव्हा ते शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलतात तेव्हा त्यांना दिल्लीतून फोन येण्याची भीती वाटत असते, असे मलिक म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचा परिणाम थेट भारतीय सैन्य दलावर होत असल्याचा गंभीर इशारा दिला होता. सैन्याच्या दोन जनरल पदावरील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच काहीही होऊ शकतं, असा इशारा दिल्याचं मलिक यांनी सांगितले होते. कारगिल युद्धाच्यावेळी सरकारच्या चुकीची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली असल्याचाही आरोप केला होता.