जर्मनीतील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक मतदारांनी राष्ट्राध्यक्षा एंजेला मर्केल यांच्याच पारड्यात आपले मत टाकले असून, त्यांच्याकडेच सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा सुपूर्द केल्या आहेत. तब्बल सहा कोटी २० लाख जर्मनवासीयांनी रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केले. एंजेला मर्केलच तिसऱ्यांदा सत्ताग्रहण करण्याचा विक्रम नोंदविण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविण्यात येत होती.
या देशाने लळा लाविला असा असा की…
अवघा युरोप आर्थिक मंदीच्या संकटाचा सामना करीत असताना जर्मनीची अर्थव्यवस्था स्थिर राखण्यात यशस्वी ठरलेल्या ५९ वर्षीय मर्केल यांना आघाडीच्या राजकारणाचे आव्हान मात्र पेलावे लागणार आहे. संपूर्ण बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यात मर्केल यांच्या नेतृत्त्वाखालील ख्रिश्चियन डेमोक्रॅटिक युनियनला काही जागा कमी पडल्या आहेत.
युरोपातील आर्थिक मंदीच्या संकटाने फ्रान्स, ग्रीस, इटली आणि स्पेनला मोठा फटका बसला आहे. ब्रिटनवरही मंदीचा मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जर्मनीची अर्थव्यवस्था स्थिर राखल्याने आणि बेरोजगारीचे प्रमाणही घटवल्याने मर्केल यांच्याकडेच सत्तेचे सुकाणू सोपविण्याची लोकांची इच्छा असल्याचे जनमत चाचण्यांतून दिसले होते. विशेष म्हणजे जर्मनीच्या एकीकरणानंतर म्हणजेच १९९०पासून मर्केल यांचेच सरकार हे सर्वात स्थिर सरकार ठरले आहे.