scorecardresearch

या देशाने लळा लाविला असा असा की..

‘द जर्मन जीनियस’ हे पुस्तक महत्त्वाचं अशासाठी की ते हिटलर, गोबेल्स वगैरेंना बाजूला ठेवत

‘द जर्मन जीनियस’ हे पुस्तक महत्त्वाचं अशासाठी की ते हिटलर, गोबेल्स वगैरेंना बाजूला ठेवत जर्मनीचा देदीप्यमान इतिहास शांतपणे आपल्यासमोर मांडतं.  थोडक्यात पण मुद्देसूदपणे, कुठेही पाल्हाळ न लावता इतिहासाचं अदृश्य चक्र शांतपणे आपल्यासमोर फिरवत राहतं. समोर येत राहतात ते विविधांगी विभ्रम. मानवी जीवनाला समृद्ध करणारे. पुढे नेणारे. आणि आनंदाश्चर्य वाटत राहतं ते याचं की हे सगळेच्या सगळे एकाच देशात कसे काय निपजले?
एका मित्राचा अनुभव. तो फ्रँकफर्टहून येत होता. विमानतळावर लवकर पोहोचला. वेळ होता म्हणून दुकानं फिरत बसला. एका दुकानात रिमोट कंट्रोलवर चालणारी गाडी दिसली. खेळण्यातली. पण खऱ्या मर्सिडीजची प्रतिकृती असेल अशी. खरी कधी विकत घेता येईल की नाही ते माहीत नाही.. तेव्हा निदान खेळण्यातली तरी घेऊ या.. असं म्हणाला मनातल्या मनात आणि मुलासाठी त्यानं ती घेऊन टाकली. त्या आधी त्या दुकानातल्या विक्रेतीकडून समजून घेतला तिचा तांत्रिक तपशील. चालवायची कशी, काय काय करते ती, बॅटरी कशी बदलायची वगैरे. तरीही वेळ बराच होता हातात म्हणून बाहेर येऊन चालवून बघत होता ती गाडी. पण ते काही जमलं नाही. ती गाडी कोणतेच आदेश मानेना. आतापर्यंत त्या विक्रेतीसमोर आज्ञाधारकपणे वागणारी ती चिमुरडी चारचाकी बाहेर आल्यावर मात्र याला जुमानेना. रागावला तो. परत गेला दुकानात. म्हणाला, गाडी खराब आहे.. बदलून द्या.
त्या विक्रेतीनं अत्यंत सौजन्यानं विचारलं काय झालं.. हा घुश्शात. भारतातला अनुभव आठवला त्याला. म्हणाला खराबच आहे ती गाडी.. तुम्ही दुय्यम दर्जाचीच चीज दिलीत मला.. वगैरे वगैरे. ती विक्रेती शांतच. याला राग व्यक्त करू दिला. भडाभडा बोलू दिलं. तो शांत झाल्यावर म्हणाली : तुमचा आग्रहच असेल तर देते बदलून पण गाडी उत्तमच आहे. तिनं तीच गाडी घेतली आणि परत सगळं काय काय करून दाखवलं. वर तुमचं काय चुकत होतं, तेही सांगितलं याला. शेवटी विचारलं, बदलून हवी का? एव्हाना हा बऱ्यापैकी ओशाळलेला. म्हणाला नको.. राहू द्या. तिला बहुधा हेच अपेक्षित असावं. यानं गाडी घेतली आणि निघाला दुकानातनं.  बाहेर पडणार तर ती विक्रेती  म्हणाली : धन्यवाद.. मला खात्री होतीच गाडी मुळीच खराब असणार नाही त्याची. यानं न राहवून विचारलं का? तिला हा प्रश्नही अपेक्षित असावा. एका क्षणात ती म्हणाली, का म्हणजे? आफ्टर ऑल इट्स जर्मन.
मला हा किस्सा सांगतानाही त्याला ओशाळं वाटत होतं. त्याला माहीत होतं माझ्याही मनात तशीच भावना असणार. कारण जर्मनी त्याच्यापेक्षा किती तरी प्रमाणात माझ्या प्रेमाचा, अभिमानाचा आणि असुयेचाही विषय आहे, हे त्याला ठाऊक होतं. आतापर्यंत तीनेकदा तरी त्या देशात वेगवेगळ्या निमित्तानं जाणं झालंय. ड्वाईशे बँक, बीएएसफ, बायर अशा रसायन कंपन्या, फ्रँकफर्टचे प्रचंड व्यापारी मेळे (जाता जाता.. तिथं गेल्यावर पहिला धक्का बसतो तो हा की फ्रँकफर्टचं पहिलं आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन इ. स. ११५० साली भरलं होतं. माहितीसाठी : आपल्याकडे सोमनाथच्या मंदिरावर गझनीच्या महम्मदाचा हल्ला १०२४ सालातला, संत ज्ञानेश्वरांची समाधी १२९६ सालची आणि अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी १३०३ सालची), बर्लिन अर्थपरिषद, बोश कंपनी अशा काही ना काही कारणानं जर्मनीत जायला मिळालेलं होतं. प्रत्येक भेटीत एक गोष्ट घडत गेली. त्या देशावरचं प्रेम भूमिती o्रेणीनं वाढत गेलं. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्शे, बोश, सिमेन्स, आदिदास, निव्हिया, सॅप, लुफ्तांसा.. इतकंच काय लॅमी कंपनीची पेनं. जर्मनीतलं सगळंच प्रेम लावणारं. त्यामुळे ‘द जर्मन जीनियस’ या पुस्तकाच्या शोधात बरेच दिवस होतो. लंडनला सापडलं. त्याचं पूर्ण नाव ‘द जर्मन जीनियस :  युरोप्स थर्ड रेनेसान्स, द सेकंड सायंटिफिक रिव्हॉल्युशन अँड द ट्वेंटिएथ सेंचुरी’.
एखादा देश, प्रांत का व कसा मोठा होतो हे ज्याला समजून घ्यायचं असेल त्याच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अत्यावश्यक वाचनच. आपल्या दृष्टीनं जर्मनीचा.. आधीचा प्रशिया.. इतिहास दुसरं महायुद्ध, हिटलर यांच्याभोवतीच फिरत राहतो. वाचनाची फारच आवड असेल तर विल्यम शिरर याचं ‘राइज अँड फॉल ऑफ द थर्ड राईश’ हे वाचलेलं असतं वा तसा प्रयत्न तरी केलेला असतो. पीटर वॅटसन यांचं ‘द जर्मन जीनियस’ त्याच्या आधी सुरू होतं. साधारण १७००व्या सालापासून जर्मनी देश म्हणून कसा कसा आकाराला येत गेला. मग तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट, संगीतकार बिथोवेन, मोझार्ट, गणिती प्लाँक, हेगेल, कार्ल मार्क्‍स, नवमानसशास्त्राचा उद्गाता सिग्मंड फ्रॉइड.. वगैरे वगैरे वाचत वाचत आपण बर्लिनपाशी पोहोचतो. १८१० साली त्या शहरात पहिलं विद्यापीठ स्थापन झालं. त्यामुळे परिसराचं चित्रच कसं बदललं आणि पुढच्या काही वर्षांत जर्मनीत जवळपास ५० आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं कशी उभी राहिली हे समजून घेत आपण १९३३ पर्यंत येतो. हे वर्ष हे हिटलरच्या उदयाचं. तिथून १९४५ सालापर्यंत ..म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अंतापर्यंत काय काय घडलं ते तसं माहीत असतं आपल्याला. परंतु हे माहीत नसतं की १९३३ पर्यंत निव्वळ जर्मनांनी मिळवलेल्या नोबेल पारितोषिकांची संख्या ही अमेरिका आणि ब्रिटन यांच्या एकत्रित नोबेल पारितोषिकांपेक्षा अधिक आहे, ते.
‘द जर्मन जीनियस’ महत्त्वाचं अशासाठी की ते हिटलर, गोबेल्स वगैरेंना बाजूला ठेवत या देदीप्यमान देशाचा इतिहास शांतपणे आपल्यासमोर मांडतं. यातला गमतीचा भाग हा की पीटर वॅटसन हे काही जर्मन नव्हेत. म्हणजे जर्मनीचा उदोउदो ते करतायत ते मायभूचे पांग फेडण्याच्या उद्देशानं वगैरे नाही. वॅटसन ब्रिटिश आहेत. युरोपात ब्रिटिश आणि जर्मन यांच्यातला छुपा संघर्ष आजही लपत नाही. ब्रिटिश मंडळींना जर्मन्स म्हणजे असंस्कृत, रांगडे वाटतात तर जर्मनांच्या मते ब्रिटिशांचा उदोउदो करण्याचं काहीही कारण नाही. तेव्हा रक्तातच असलेली ही स्पर्धेची भावना दूर ठेवत जर्मन जीनियस लिहिण्याचं काम वॅटसन यांनी केलं आहे. मुळात ते तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आदी परंपरांचे अभ्यासक असल्याने त्यांच्या लिखाणात काहीही आणि कसलाही अभिनिवेश नाही. या तत्त्वज्ञानप्रेमामुळे असेल पण कांट यांच्या पारडय़ातली शब्दसंख्या जरा जास्तच आहे. अर्थात आपल्यासाठी ते योग्यही. कारण तो प्रदेश तसा आपल्याला नवखाच. बाकी अन्यांत वॅटसन फार अडकत नाहीत. थोडक्यात पण मुद्देसूदपणे, कुठेही पाल्हाळ न लावता ते इतिहासाचं अदृश्य चक्र शांतपणे आपल्यासमोर फिरवत राहतात. समोर येत राहतात ते विविधांगी विभ्रम. मानवी जीवनाला समृद्ध करणारे. पुढे नेणारे. आणि आनंदाश्चर्य वाटत राहतं ते याचं की हे सगळेच्या सगळे एकाच देशात कसे काय निपजले? आहे तरी काय त्या देशाच्या मातीत असं की मानवी प्रतिभेचं समग्र तारकादल त्या देशात फुलून यावं.. तसं पाहायला गेलं तर जर्मनी आकारानं महाराष्ट्राइतकाच जेमतेम. आठेक कोटींची लोकसंख्या. म्हणजे त्या बाबत महाराष्ट्रापेक्षाही कमीच. पण तरी हे इतकं असं त्या देशात कसं काय होतं..  ते समजून घेण्यासाठीच हे पुस्तक वाचायला हवं.
पण आताच का?
कारण उद्या, रविवारी, जर्मनीत निवडणुका आहेत. आणि चिन्ह दिसतायत की अँजेला मर्केल बाई पुन्हा सत्तेवर येतील. युरोपीय संघटनेचा कोसळता डोलारा बाई आपल्या एकटय़ाच्या खांद्यावर सांभाळतायत. बाकीचे सगळे युरोपीय देश.. अगदी डेव्हिड कॅमेरून यांचं ब्रिटनही.. खार खाऊन आहेत मर्केल बाईंवर. पण बाई कोणालाही भीक घालत नाहीत. जराही विचलित होताना दिसत नाहीत. साहजिकच आहे. शेवटी त्याही या ओजस्वी जर्मन जीनियसचाच भाग आहेत.
तसं शिकण्यासारखं बरंच असतं अशा पुस्तकात..
द जर्मन जिनियस –  युरोप्स थर्ड रेनेसान्स, द सेकंड
सायंटिफिक रिव्हॉल्युशन अँड द ट्वेंटिएथ सेंचुरी : पीटर वॅटसन,
प्रकाशक  : सायमन अँड शुश्टर,
पाने : ९६४, किंमत : ९.९९ पौंड.

मराठीतील सर्व बुक-अप! ( Bookup ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The german genius glorious history of german beyond hitler and goebbels

ताज्या बातम्या