MiG-21 Fighter Jets: गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अपघातांमध्ये नाव आलेले MIG-21 हे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान निवृत्त होत आहे. भारतीय हवाई दलाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात विशेष कार्यक्रमात या विमानाला अखेरचा निरोप दिला जाणार आहे. शेवटची काही वर्षं या फायटर जेटसाठी कमालीची आव्हानात्मक राहिली असली, तरी त्याआधी भारताच्या अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये मिग-२१ नं मोलाची भूमिका बजावली आहे. यात १९६५ च्या युद्धापासून अगदी हल्लीच्या ऑपरेशन सिंदूरचादेखील समावेश आहे.

६२ वर्षांचा विलक्षण प्रवास!

१९६२ साली मिग-२१ विमानं भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. तेव्हापासून अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये ही विमानं भारतीय हवाई दलाच्या मोहिमांचा प्रमुख भाग राहिली आहेत. यात १९६५ व १९७१ ची भारत-पाकिस्तान युद्धं, १९९९ चं कारगिल युद्ध, २०१९ चा बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेली हवाई मोहीम यांचा समावेश आहे.

ठरल्यापेक्षा अधिक काळ दिली सेवा!

दरम्यान, मिग-२१ लढाऊ विमानांमध्ये १९६० च्या दशकापासून आत्तापर्यंत अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. याआधीच ही विमाने निवृत्त केली जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांच्याजागी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणारी भारतीय बनावटीची एलसीए तेजस एमकेवनए ही लढाऊ विमानं सज्ज होण्यास विलंब लागला. त्यामुळे पर्यायाने मिग-२१ विमानांची निवृत्तीही लांबत गेली. अखेर आता या प्रकारातील शेवटच्या मिग-बायसन (MiG Bison) श्रेणीतील लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त केलं जाणार आहे.

सोव्हिएत युनियनमध्ये मिकोयान-गुरेविच ब्युरोनं ही विमानं तयार केली होती. त्या नावावरूनच या विमानांना MiG-21 असं नाव पडलं. जवळपास ६० देशांनी या विमानांना आपल्या हवाई दलात समाविष्ट करून घेतलं होतं. सर्वाधिक मिग-२१ विमानं भारताच्या ताफ्यात होती. सध्या मिग-२१ बायसन श्रेणीतील ३१ लढाऊ विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४०० अपघातांमुळे ठपका!

दरम्यान, अनेक मोहिमांमध्ये भारतीय हवाई दलाकडून शत्रूवर प्रभावी मारा करणाऱ्या मिग-२१ लढाऊ विमानांवर गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमुळे कार्यक्षमतेबाबतचा ठपका ठेवला जात आहे. एका आकडेवारीनुसार या विमानांचे जवळपाच ४०० अपघात झाले असून त्यात काही वैमानिकांचे मृत्यूदेखील ओढवले आहेत. त्यामुळेच या विमानांवर ‘उडत्या शवपेट्या’ असा ठपका ठेवला गेला.