दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये फरक करणे गरजेचे असल्याचे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी बुधवारी व्यक्त केले. भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला बुरहान वानीचा मोठा भाऊ खालिद वानीच्या कुटुंबीयांना सरकारी मदत जाहीर केल्याच्या मुद्द्यावरून भाजपसह विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करताना दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये फरक केला पाहिजे, असे सांगितले. त्यांच्याकडे एकाच नजरेने बघणे योग्य ठरणार नाही, असेही मुफ्ती यांनी म्हटले. खालिद वानी हा ८ जुलै रोजी भारतीय सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीचा भाऊ होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना सरकारी मदत जाहीर झाल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. खालिद हा दहशतवादी असल्याचे आमचे ठाम मत असल्यामुळे आमचा या मदतीला विरोध असल्याचे पीडीपीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने स्पष्ट केले होते. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या सानुग्रह अनुदान किंवा नुकसान भरपाई देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे भाजपचे प्रवक्ते सुनिल सेठी यांनी म्हटले होते. काँग्रेसनेही या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत ही मदत म्हणजे देशाच्या एकात्मतेशी केलेली तडजोड आणि भारतील लष्कराच्या शौर्याविरोधात असल्याचे सांगितले होते. या टीकेनंतर पीडीपी सरकारने काहीशी नमती भूमिका घेतली होती. यासंदर्भातील अंतिम निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आला नसून भारतीय लष्कर याबाबत आक्षेप घेऊ शकते, अशी माहिती नुकसान भरपाईसंदर्भाती निर्णय घेणाऱ्या समितीचे प्रमुख मुनीर उल इस्लाम यांनी दिली.
अशा प्रकारची मदत सामान्यपणे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात किंवा दहशतवाद्यांबरोबर झालेल्या लष्करी कारवाईदरम्यान मृत्यू पावलेल्यांना दिली जाते. परंतु वानी कुटुंबीयांना देण्यात येणारी ही मदत नियमाचे उल्लंघन करून देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. हा निर्णय म्हणजे जवानांचे खच्चीकरण करण्यासारखे असल्याचे बोलले जाते. या नुकसानभरपाई प्रकरणामुळे खालिदच्या चकमकीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. सरकारने खालिदला सामान्य नागरिक म्हटले आहे. विशेष म्हणजे वानी कुटुंबीयांकडून खालिद आणि लष्करातील चकमक बनावट असल्याचा दावा पूर्वीपासून केला जातोय. २५ वर्षीय खालिद हा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठमधून (इग्नू) एम.ए करत होता. लष्कराच्या मते तो हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी होता. तर वानी कुटुंबीयाकडून त्याला यातना देऊन मारण्यात आल्याचे म्हणणे आहे. खालिदचे दात तुटले होते. त्याच्या शरीरावर गोळीबाराचे निशाण नव्हते. त्याच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला होता, असा दावा त्याच्या वडिलांनी केला होता. १३ एप्रिल २०१५ रोजी खालिदने आपण सहलीला चालल्याचे आईला सांगितले होते. काही तासातच त्याचा मृतदेह जंगलात आढळून आला होता.