पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेरोजगारीच्या मुद्दय़ावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘लाखो तरुण नोकऱ्या शोधत असताना, पंतप्रधान अवघ्या काही हजार युवकांना नोकरीची नियुक्तिपत्रे देत आहेत,’’ अशा शब्दांत त्यांनी ही टीका केली.

‘ट्वीट’च्या मालिकेत खरगे म्हणाले, की मोदी दरवर्षी दोन कोटी नवीन नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले, परंतु ते अशा नवीन चांगल्या वेतनाच्या नोकऱ्या निर्माण करणे विसरले. भाजपच्या नेतृत्वाखालील  केंद्र सरकारच्या विद्यमान दहा लाख रिक्त जागा भरण्याचा विचार करण्यासही आठ वर्षे लागली. पंतप्रधान मोदी ‘रोजगार मेळावा’ घेत आहेत. नियुक्तिपत्रे देत आहेत अन् मेळाव्याला संबोधित करत आहेत. दिल्लीत ७५ हजार, गुजरातमध्ये १३ हजार आणि जम्मू-काश्मीरमध्ये तीन हजार नियुक्तिपत्रे दिली आहेत. सध्या लाखो तरुण नोकरीच्या शोधात असताना, पंतप्रधान काही हजार नियुक्तिपत्रे देत आहेत.

खरगे यांनी नमूद केले, की ग्रामीण भारत बेरोजगारीच्या अभूतपूर्व आव्हानांचा सामना करत आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’नुसार गेल्या सहा वर्षांतील सरासरी ग्रामीण बेरोजगारी ७.०२ टक्के आहे.आमच्या तरुणांना सरकारी नोकरीसाठी वर्षांनुवर्षे वाट पाहावी लागत आहे. हे सर्व भाजपच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि खोटय़ा आश्वासनांमुळे आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे, की अग्निपथ योजनेंतर्गत ४० हजार पदांसाठी सरकारला ३५ लाख अर्ज आले आहेत. उत्तर प्रदेशात काही हजार पदांसाठी ३७ लाख अर्ज आले आहेत. पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएच.डी. झालेले तरुण पात्रतेपेक्षा कमी असलेल्या नोकऱ्यांसाठी अर्ज करत आहेत.

संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्र सरकारच्या शाळा, उच्च शिक्षण संस्था, आरोग्य संस्था, सार्वजनिक उद्योग, सरकारी बँका, पोलिस आणि न्यायालयां यासह सार्वजनिक क्षेत्रात सध्या लाखो रिक्त पदे आहेत, असे सांगून खरगे म्हणाले, की संरक्षण दले ही आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे स्तंभ आहेत. सध्या संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांत दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. असे असताना भरतीच्या पातळीवर निराशाजनक चित्र आहे. अद्याप केंद्र सरकारच्या शाळांमध्ये अजूनही १८ हजार जागा रिक्त आहेत. अशा जागा रिक्त ठेवून या शाळांनी शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा तरी सरकार कशी करू शकते, असा सवाल खरगे यांनी केला.

त्यांनी नमूद केले, की ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ आणि केंद्रीय विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये ६१ हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. करोना महासाथीत डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, औषधांचा तुटवडा आपण अनुभवला. मात्र, तरीही सरकार यातून धडा शिकलेले नाही. अंगणवाडी सेविकांची एक लाख तीन हजार ५४४ पदे रिक्त आहेत.

घोषणांचे काय झाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. आता आम्हाला ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’विषयी काही ऐकू येत नाही. या उपक्रमांचे व घोषणांचे काय झाले? तुम्ही दिलेल्या १६ कोटी नोकऱ्या कुठे आहेत? मोदीजी तुम्ही गप्प का आहात? असा सवालही खरगे यांनी विचारला.