गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील निवडणुकीच्या रिंगणात भाजपा, काँग्रेससह अन्य पक्षही असणार आहेत. तर आता ‘एमआयएम’नेही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय गुजरातमधील काही भाजपा खासदार संपर्कात असल्याचाही दावा जलील यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही गुजरात निवडणूक नक्कीच लढणार. आमचे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलेलं आहे की, आम्ही सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत. आम्ही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा कारण म्हणजे, जेव्हा आम्ही गुजरातला गेलो होतो, तेव्हा तिथल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा आमचा मनोबल वाढवणारा होता. केवळ चार-पाच शहरांमध्येच आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि आमचे २६ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर जे ११ अपक्ष उमेदवार होते, जे विविध शहरांमधून आलेले होते, त्यांनाही आमच्या पक्षात प्रवेश केला. आमचे गुजरातचे अध्यक्ष हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.” त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे खूप चांगलं काम केलेलं आहे. असं जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

आतापर्यंत पाच जागांची घोषणा –

याशिवाय “लोकांना बदल हवा आहे, त्यांचा विश्वास काँग्रेसवर राहिलेला नाही. म्हणून ते एमआयएमच्या बरोबर येणार आहेत. आतापर्यंत पाच जागांची घोषणा ओवेसींनी केलेली आहे. आणखी काही जागांची घोषणा ते करणार आहेत आणि पूर्ण ताकदीने आम्ही गुजरातची निवडणूक लढणार आहोत.” असंही यावेळी खासदार जलील म्हणाले.

हिमाचल प्रदेशसोबतच गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम का झाला नाही जाहीर? –

निवडणूक आयोगाकडून या दोन्ही राज्यातील निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर होईल, असा कयास बांधला जात होता. तसेच दोन्ही राज्यांत सोबत निवडणुका होतील आणि निकालही सोबतच जाहीर केला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २०१७ साली ज्या प्रमाणे दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम वेगवेगळा जाहीर करण्यात आला होता, अगदी त्याच प्रमाणे याही वर्षी निवडणुकीच्या तारखा वेगवेगळ्या जाहीर केल्या जात आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

तर गुजरात विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ साली समाप्त होणार –

आम्ही सध्या गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही. यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणेच याही वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमधील निवडणुका सोबत घेतल्यामुळे निकाल जाहीर करण्यास जास्त कालावधी लागू शकतो. या दोन्ही राज्यांच्या विधानसभा कार्यकाळ समाप्तीमध्ये एकूण ४० दिवसांचे अंतर आहे,” असे कुमार यांनी सांगितले आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ ८ जानेवारी २०२३ तर गुजरात विधानसभेचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी २०२३ साली समाप्त होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim will contest gujarat assembly elections mp imtiaz jalil msr
First published on: 19-10-2022 at 09:16 IST