नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) परिस्थिती अद्याप अत्यंत नाजूक आणि धोकादायक असल्याचे लष्कराचे मत आहे. चीन आणि भारताने अनेक भागांतून लष्कर हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तरी काही भागांत उभय देशांचे लष्कर समोरासमोर तैनात असल्याने धोका कमी झालेला नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या ताबारेषेवर परिस्थिती स्थिर आहे, परंतु खूप बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी हे वक्तव्य केले आहे. एका वृत्त माध्यमाच्या संवादात्मक सत्रात बोलताना जयशंकर यांनी सांगितले, की मी आणि चीनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सप्टेंबर २०२० मध्ये ही समस्या कशी सोडवावी, याबाबत एक तत्वत: करार केला होता. या करारानुसार पावले उचलणे ही आता चीनची जबाबदारी आहे. भारत आणि चीनच्या लष्करी तुकडय़ा पूर्व लडाखमधील काही वादग्रस्त भागांत तीन वर्षांपासून समोरासमोर उभ्या आहेत. राजनैतिक आणि लष्करी स्तरावर उभय पक्षीय व्यापक चर्चेनंतर अनेक भागांतून दोन्ही देशांनी लष्कर हटवले आहे, असेही जयशंकर यांनी नमूद केले. 

चीन-भारत संबंधांतील हा एक अतिशय आव्हानात्मक टप्पा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १९८८च्या चीन दौऱ्यापासून ते २०२० पर्यंत सीमेवर शांतता आणि शांतता राखण्यात येईल, असे मानले जात होते, असे नमूद करीत जयशंकर यांनी सीमेवर मोठय़ा प्रमाणात सैन्य तैनात न करण्यासंदर्भात दोन्ही देशांत झालेल्या करारांचा संदर्भ दिला.

‘जी-२०’ बैठकीत चर्चा

जयशंकर यांनी, २ मार्च रोजी दिल्लीत ‘जी-२०’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री चीन गांग यांच्याशी झालेल्या भेटीत या विषयावर दीर्घ चर्चा झाल्याचे सांगितले. त्यात तत्कालीन परराष्ट्रमंत्री वांग यांच्याशी झालेल्या कराराचे पालन करण्याचे गांग यांना आवाहन करण्यात आले होते, असेही जयशंकर म्हणाले.

मी आणि चीनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सप्टेंबर २०२०मध्ये सीमेवरील तणावाची समस्या कशी सोडवावी, याबाबत एक तत्वत: करार केला होता. त्यानुसार पावले उचलणे ही आता चीनची जबाबदारी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– एस. जयंशकर, परराष्ट्रमंत्री