जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील हिमाच्छादित मचैल पर्वतरागांतून हंगेरीचा नागरिक असलेल्या एका ३८ वर्षीय गिर्यारोहकाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.  त्यासाठी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त मोहीम राबविली, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली.

एकटय़ानेच मोहिमेवर निघालेला हा प्रवासी मूळचा बुडापेस्ट येथील आहे. त्याचे नाव अक्कोएस व्हर्मेस असे आहे. हिमालयाच्या रांगांत गिर्यारोहण मोहिमेवर असताना उमासिला खिंडीत त्याचा रस्ता चुकला होता. पाच दिवस अत्यंत प्रतिकूल वातावरणाचा मुकाबला करीत तो भटकत होता, अशी माहिती जम्मूतील लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी दिली.

हा गिर्यारोहक बेपत्ता झाल्याचे समजताच भारतीय लष्कराने आपल्या नि:स्वार्थ सेवेच्या परंपरेनुसार त्याच्या शोधासाठी धूल येथील राष्ट्रीय रायफल्सचे एक पथक शोधमोहिमेवर पाठविले. या पथकाने तसेच हवाई दलाच्या उधमपूर येथील पथकाने परस्पर समन्वयाने सुमारे ३० तासांहून अधिक काळ या परदेशी गिर्योरोहकाचा शोध घेतला. मचैल, पद्दार पर्वतरांगांच्या वरच्या दुर्गम भागातून या गिर्यारोहकाची यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली. लष्कराच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

हिमशिखरांतून सुरक्षित सुटका झालेल्या अक्कोएस व्हर्मेस यांनी सांगितले की, मी  अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलो होतो. मला सुरक्षितपणे माघारी आणल्याबद्दल भारतीय लष्कराचा आभारी आहे.