मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पार पडलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये भाषण करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन टीका करण्यांना खडे बोल सुनावले. हिंदूत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदूत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला. “तुम्ही काय केलंत हिंदुत्वसाठी, राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश हा कोर्टाने दिला आहे, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपाचे नाव न घेता केली. मात्र या भाषणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राम मंदिरासंदर्भात एक ट्विट करत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतरच सोमवारी सायंकाळी राजू पाटील यांनी ट्विटरवरुन ‘आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांच्या माहितीसाठी’ असं म्हणत एक ट्विट केलंय. बजरंग दलाचे मुंबई प्रमुख शंकर गायकर यांचं एक वक्तव्य शेअर करत बाबरी मशिद पाडण्याच्या वेळी शिवसैनिक उपस्थित नव्हते असा दावा राजू पाटील यांनी केलाय. यामधून त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. “बाबरी मशिदीवर मी माझ्या लोकांसोबत चढलो होतो आणि ढाचा आम्ही पाडला.तिथं एकतरी शिवसैनिक होता असं सिद्ध झालं तर मी माझं आयुष्य त्यांना अर्पण करायला तयार आहे,” असं शंकर गायकर म्हणाले होते, अशी आठवण राजू पाटील यांनी करुन दिलीय.

या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता ‘आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे’ असा टोला शिवसैनिकांना लगावला आहे. बाबरीचं पतन झालं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे माझ्या शिवसैनिक यात असतील तर मला त्याचा अभिमान आहे अशाप्रकारचं वक्तव्य केल्याचं सांगितलं जातं. त्याचाच संदर्भ आता या ट्विटशी जोडला जातोय.

राणांवरही साधला निशाणा
‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दांपत्याचाही थेट उल्लेख न करता मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला लगावला. आमच्या घरात येऊन कसेही बोलायचे, त्याला काहीतरी पद्धत हवी. मात्र दादागिरी कराल, तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी शिकवले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. लवकरच मी सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.