देशात मॉब लिंचिंगच्या घटना या एखाद्या साथीच्या रोगासारख्या पसरू लागल्या आहेत असं अभिनेत्री स्वरा भास्करने म्हटलं आहे. जमावाकडून मारहाणीच्या घटना होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वास्तवापासून आपण पळू शकत नाही असेही तिने म्हटले आहे. झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) वाढत्या घटना थांबायला हव्यात यासाठी ४५ पेक्षा जास्त सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अदूर गोपालकृष्णन, मनीरत्नम, अनुराग कश्यप, बिनायक सेन, सुमित्रो चॅटर्जी, अपर्णा सेन, कोंकणा सेन-शर्मा, रेवती, श्याम बेनेगल, शुभा मुद्गल, रुपम इस्लाम, अनुपम रॉय, परमब्रता, रिद्धी सेन यांसह अनेकांचा समावेश आहे.

हे सगळं प्रकरण ताजं असतानाच अभिनेत्री स्वरा भास्करनेही मॉब लिंचिंगचे प्रकार देशात साथीच्या रोगासारखे पसरत आहेत, वाढीला लागले आहेत असे म्हटले आहे. आपल्या विविध प्रकारच्या वक्तव्यांसाठी स्वरा भास्कर कायमच चर्चेत असते. तिने आता मॉब लिंचिंगच्या घटनांवरही भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेलिब्रिटींनी लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता स्वराने फक्त स्मित हास्य केलं. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.

मी मागच्या तीन ते चार वर्षांपासून मॉब लिचिंगच्या वाढत्या घटनांबाबत आवाज उठवते आहे. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा स्थानिक प्रशासनाने त्याकडे लक्ष देणे, कारवाई करणे गरजेचे आहे असे मला वाटते. मानवी सुरक्षा कायदा आणला जावा याची मागणी मी करते आहे. मॉब लिचिंगच्या घटना रोखल्या जाव्यात यासाठी पंतप्रधानांनी त्यामध्ये लक्ष घालावे अशीही मागणी स्वराने केली आहे.