केंद्र सरकारचे शंभर दिवस हे विकास, विश्वास तसेच देशापुढील मोठय़ा आव्हानांचे होते. या दिवसांत ठोस निर्णय, निष्ठा व सद्भावनेतून वाटचाल झाली. आव्हानांना कसे सामोरे जायचे हे आम्हाला माहीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

रोहतक येथे विजय संकल्प सभेद्वारे पंतप्रधानांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची सुरुवात केली. कृषी क्षेत्र असो किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामागे १३० कोटी भारतीयांची प्रेरणा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देश प्रत्येक आव्हानाला कणखरपणे सामोरा जात आहे, असे त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा संदर्भ देत नमूद केले.

अनेक महत्त्वाचे कायदे नव्या सरकारने मंजूर केले. यात दहशतवादाचा कठोरपणे सामना करणे तसेच मुस्लीम महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भातील कायद्यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या क्षेत्रांचा आराखडा सरकारने तयार केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. यामध्ये बँकिंग क्षेत्र भक्कम करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ सुरुवात असून, त्याचे परिणाम जाणवू लागतील, असे मोदींनी स्पष्ट केले. स्वच्छ भारत, योगा, उज्ज्वला, फिट इंडिया यांसारखे उपक्रम व्याधींवर नियंत्रण ठेवण्यात फायदेशीर ठरल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जलसंवर्धनासाठी जनतेने साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून विरोधक सावरलेले नाहीत, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

सर्वच पक्षांचे आभार

संसदेत विक्रमी कामकाज झाल्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे त्यांनी आभार मानले. उशिरापर्यंत कामकाज झाल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत हरयाणात दहाही जागा भाजपला मिळाल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.