scorecardresearch

“मोदी सरकारला फक्त काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर विरोधी पक्षमुक्त भारत हवाय”, कपिल सिब्बल यांची टीका

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली.

Kapil Sibal Congress leader
कपिल सिब्बल (संग्रहीत छायाचित्र)

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की न्यायव्यवस्थेतील काही सदस्यांनी आम्हाला निराश केलं आहे. अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडल्या, त्यामुळे माझं डोकं शरमेनं झुकलं आहे. सिब्बल पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ लावला आहे, तो दुर्भाग्यपूर्ण आहे. घटनात्मकदृष्ट्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जे स्थान आहे, ते स्थान त्याला मिळालं नाही.

केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करताना सिब्बल म्हणाले की, न्यायव्यवस्थेची गळचेपी करून त्यांनी प्रत्यक्षात आणीबाणी आणली आहे. देशात दररोज कायद्याचे उल्लंघन केलं जात आहे. सध्याच्या केंद्र सरकारला केवळ काँग्रेसमुक्त भारत नकोय तर विरोधी पक्षमुक्त भारत हवा आहे, असंही सिब्बल पुढे म्हणाले.

न्यायव्यवस्थेतील काही सदस्यांनी निराश केलं – कपिल सिब्बल
Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्या अटकेबाबत विचारले असता सिब्बल म्हणाले की, अधिक चिंताजनक बाब म्हणजे न्यायव्यवस्थेतील काही सदस्यांनी आम्हाला निराश केले आहे. मी गेल्या ५० वर्षांपासून ज्या संस्थेचा (न्यायपालिकेचा) भाग आहे, त्यातील काही सदस्यांनी आम्हाला निराश केलं आहे. जे काही घडलं आहे, त्यामुळे माझी मान शरमेनं खाली झुकते. देशातकायद्याचं उल्लंघन होत असताना न्यायव्यवस्था त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. हे पाहून अस्वस्थ वाटतं, असंही ते म्हणाले.

सिब्बल यांनी ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक झुबेर यांना दिल्ली न्यायालयाने जामीन नाकारल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, चार वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटसाठी एखाद्या व्यक्तीला अटक करणे अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे संबंधित ट्वीटमुळे कोणताही जातीय संघर्ष किंवा तेढ निर्माण झाला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Modi government wants not only congress free india but also opposition free india statement by rajyasabha mp kapil sibal rmm

ताज्या बातम्या