केंद्र सरकारने जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. या पाहुण्यांच्या यादीतून सरकारने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वगळलं आहे. यावरून तामिळनाडूतील काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीभेदाचा आरोप केला. ‘मोदी है तो मनु है’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू ऋषी महर्षी मनू यांचा वारसा जपत आहेत. महर्षी मनू हे प्राचीन हिंदू ऋषी असून त्यांनी मनुस्मृती लिहिल्याचं म्हटलं जातं. मनुस्मृती हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. हिंदू आचरणासाठी मार्गदर्शक पुस्तक म्हणून मनुस्मृतीची ओळख आहे. पण या पुस्तकातून जातीभेदाचा प्रचार होत असल्याचा आरोप विविध तज्ज्ञांकडून केला जातो.

हेही वाचा- “मनोज जरांगेंच्या जीवाला…”, घोषणा देत जालन्यात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

दरम्यान, कुमारमंगलम यांनी मागासवर्गीय नेत्यांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना निमंत्रित न करण्याच्या यापूर्वी घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केलं नव्हतं.

हेही वाचा- “ही वेड्याची…”; जितेंद्र आव्हाडांकडून IIT मंडीच्या संचालकांवर टीकास्र, नेमकं प्रकरण काय?

याबाबत माहिती देताना खरगे यांच्या कार्यालयानं सांगितलं की, शनिवारी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या G20 डिनरसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित केलं नाही. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला निमंत्रित करण्यात आलं नाही. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, भारत सरकारचे सचिव आणि इतर प्रमुख पाहुण्यांना डिनरची निमंत्रणे मिळाली आहेत.