Mohammed Nizamuddin LinkedIn Post Goes Viral: दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी तेलंगणातील मोहम्मद निजामुद्दीन या तरुणाला गोळ्या घालून ठार मारले होते. हा तरुण कॅलिफोर्नियामध्ये इंजीनिअर म्हणून काम करायचा. दरम्यान त्याच्या मृत्यूपूर्वी त्याने लिंक्डइनवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये मोहम्मद निजामुद्दीनने त्याच्या पूर्वीच्या कंपनीचा मालक, सहकारी आणि रूममेट्सनी त्याला त्रास दिल्याचा आणि त्याच्याशी वांशिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

वांशिक द्वेषाचा बळी

तेलंगणातील महबूबनगर येथील मोहम्मद निजामुद्दीनने त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी लिंक्डइनवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तो “वांशिक द्वेषाचा बळी” असल्याचा दावा केला होता आणि “अमेरिकन मानसिकता” संपवण्याचे आवाहन केले होते.

अन्याय्य पगार

मोहम्मद निजामुद्दीनने पोस्टमध्ये म्हटेल होते की, त्याला अन्याय्य पगार देण्यात येत होता. तसेच त्याला नोकरीवरून चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला त्याचे निवासस्थानही रिकामे करण्यास भाग पाडण्यात आले. यामुळे त्याची परिस्थिती खूप बिकट झाली होती.

अमेरिकन मानसिकतेचा अंत झाला पाहिजे

लिंक्डइन पोस्टमध्ये निजामुद्दीनने म्हटले होते की, “मी वांशिक द्वेष, वांशिक भेदभाव, वांशिक छळ, वेतन फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकणे याचा बळी ठरलो आहे. आज मी सर्व अडचणींविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. पुरे झाले, श्वेत वर्चस्ववाद/वर्णद्वेषी श्वेत अमेरिकन मानसिकतेचा अंत झाला पाहिजे. कॉर्पोरेट अत्याचारी लोकांची दादागिरी संपली पाहिजे आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

कंपनीकडून फसवणूक

तो पोस्टमध्ये पुढे म्हणाला की, जेव्हा तो ईरीएएम सिस्टीम्सद्वारे गुगलमध्ये काम करत होता, तेव्हा त्याला खूप विरोध आणि वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. “याव्यतिरिक्त कंपनीने पगारात फसवणूक केली. कामगार विभागाच्या वेतन नियमांनुसार मला योग्य वेतन दिले गेले नाही. त्यांनी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मला नोकरीवरून काढून टाकले”, असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण?

कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी सांता क्लारा येथील त्याच्या निवासस्थानी त्याच्या रूममेटवर चाकूने वार केल्यानंतर कॅलिफोर्निया पोलिसांनी निजामुद्दीनला गोळ्या घातल्या होत्या. दरम्यान, निजामुद्दीनच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूबाबत कोणताही कल्पना नव्हती. दोन आठवड्यानंतर निजामुद्दीनच्या एका सहकाऱ्याने फोन केल्यानंतर कुटुंबियांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजली.