भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकिट दिले नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ३१२ आमदारांपैकी एकही मुस्लिम नाही. राज्यात २० टक्के मुस्लिम असून यावेळी मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही अशी टीका विरोधक करत होते परंतु प्रतिनिधीक स्वरुपात का असेना मुस्लिम व्यक्तिला आपल्या मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. माजी क्रिकेटपटू मोहसीन रझा यांना आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला आहे. एकूण ४७ जणांच्या मंत्रिमंडळात ते एकमेव मुस्लिम आहेत. मोहसिन रझा यांनी उत्तर प्रदेशच्या संघाचे रणजीमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
रझा यांनी २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रझा हे सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहे. मुस्लिम समाजाला भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचे त्यांनी या काळात केले. या निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले मतदान मिळाले आहे. त्या मागे मोहसीन रझा सारख्या अनेक मुस्लिम कार्यकर्ते, प्रवक्त्यांची भूमिका होती. रझा यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर सहा महिन्याच्या आत जावे लागेल.
भारतीय जनता पक्षात आल्यापासून राज्याचे क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधित्व वाढवण्याचे काम त्यांनी हाती घेतले. भारतीय जनता पक्षच हा देशातील एकमेव पक्ष आहे ज्याला सामान्य माणसांची काळजी आहे. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यावर रझा यांनी वेळोवेळी टीका केली आहे. मुलायम हे मुस्लिमांची दिशाभूल करतात असा आरोप त्यांनी केला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून मुलायम यांनी मुस्लिमांचा फक्त राजकारणासाठी वापर केल्याचे ते म्हणतात.
त्यांच्या निवडीवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रझा यांचे कार्य फक्त मुस्लिम समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजातील उदयोन्मुख खेळाडूंना पुढे आणण्यास ते मदत करत आहेत. तेव्हा त्यांची मंत्रिमंडळात झालेली निवड ही योग्य आहे अशी भावना लोकांनी व्यक्त केली आहे.