भारत व अमेरिका यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली एक खासगी कंपनी मून एक्स्प्रेस यान चंद्रावर सोडणार असून त्यांना उड्डाणाची परवानगीही मिळाली आहे व मानवी मृतदेहांची रक्षा किंवा अवशेष किलोला ३० लाख अमेरिकी डॉलर्स दराने चंद्रावर नेऊन सोडण्याची घोषणा यात करण्यात आली आहे.

मून एक्सप्रेसची स्थापना नवीन जैन यांनी गेल्या आठवडय़ात केली असून त्यांना संघराज्य हवाई प्रशासनाने मान्यता दिली आहे व ते यान २०१७ पर्यंत चंद्रावर उतरणार आहे. अशी परवानगी मिळालेली ती पहिलीच खासगी कंपनी ठरली आहे. अमेरिकेने हा धोरणात्मक निर्णय घेतला असून चंद्रावर अशा प्रकारची पहिलीच मोहीम पाठवली जाणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मून एक्सप्रेसबाबत दिलेल्या वृत्तानुसार यानाच्या मदतीने चंद्रावर मानवी मृतदेहांची रक्षा म्हणजे अस्थी पाठवल्या जाणार आहेत. जसे आपण अस्थिविसर्जन गंगेत किंवा गोदावरीत करतो, तसे चंद्रावरील अस्थिविसर्जनासारखा तो प्रकार आहे. यात एका किलोमागे ३० लाख डॉलर्स खर्च येणार आहे. प्रौढांच्या अस्थींचे वजन ४ ते ६ पौंड असते त्यामुळे ते चंद्रावर पाठवण्यास ५४ लाख ते ८१ लाख डॉलर्स खर्च येईल. या सेवेला खूप मागणी असणार आहे असे सांगण्यात आले.

आमच्याकडे चंद्रावर अस्थी पाठवण्यासाठी अनेकांची रांग आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर अजून खासगी मोहिमांना परवानगी नव्हती केवळ सरकारी अवकाश मोहिमाच राबवल्या जात होत्या. मून एक्स्प्रेसला कुठल्या सीमा असणार नाहीत, आपल्या रक्षणासाठी अवकाश प्रवास हेच भविष्य असेल तेच मुलांचे सीमारहित भवितव्यही असेल, असे जैन यांनी सांगितले. आगामी काळात चंद्रावरील मौल्यवान साधने, धातू, खडक पृथ्वीवर आणण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही कंपनी २०१० मध्ये बॉब रिचर्ड्स, जैन व अवकाश तंत्रज्ञान गुरू बार्नी पेल यांनी स्थापन केली होती. अवकाश मोहिमांचा व्यावसायिक वापर करण्याचा भाग यात आहे.