देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संसर्गाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रातील २५.७ टक्क्यांमध्ये आढळला असल्याचेही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) १७ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. याबाबत आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की, १८ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील २८ हजार ५८९ जणांची पाहणी करण्यात आली त्यापैकी २१.४ टक्के जणांना यापूर्वीच करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तर १० ते १७ वर्षे वयोगटातील २८,५८९ जणांची पाहणी करण्यात आली, त्यापैकी २५.३ टक्के जणांनाही यापूर्वीच करोनाची लागण झाल्याचे आढळले.