Mosquito Control Using AI : सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफीशीयल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात केला जात आहे. मात्र आंध्र प्रदेशमध्ये एक असा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जात आहे, ज्यामध्ये डासांचा उपद्रव संपवण्यासाठी चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे. सरकार लवकरच हा प्रोजेक्ट लाँच करणार असून याचे नाव ‘स्मार्ट मॉस्किटो सर्व्हेलन्स सिस्टम (SMoSS)’ असे आहे. सहा महापालिकांमध्ये ६६ वेगवेगळ्या ठिकाणी याची सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये विशाखपटनम, विजयवाडा, काकीनाडा, राजामहेंद्रवरम, नेल्लोरे आणि कुर्नूल यांचा समावेश आहे.
या प्रणालीच्या मदतीने अधिक प्रभावीपणे आणि सुरक्षित पद्धतीने डासांना शोधणे आणि त्यांची संख्या नियंत्रित करणे ही कामे केली जातील, असे महानगरपालिका प्रशासनाचे संचालक पी. संपत कुमार म्हणाले.
हा उपक्रम महानगरपालिका प्रशासन आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडून राबवला जात आहे. मान्सूनच्या हंगामात राज्यात डेंग्यू आणि मलेरिया यांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते, २०२४ मध्ये राज्यात ५,५५५ आणि २०२३ मध्ये ६.४५३ डेंग्यूची प्रकरणे आढळली होती.
ही यंत्रणा काम कसे करते?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, SMoSS ही प्रणाली एआयवर चालणारे मॉस्किटो सेंसर्स, ड्रोन्स आणि इतर यंत्रांच्या मदतीने डासांची प्रजाती, त्यांचे लिंग, संख्येची घनता आणि वातावरणाची स्थिती जसे की तापमान आणि आद्रता याबद्दल माहिती मिळवते. एखाद्या ठिकाणी जेव्हा डासांची संख्या सुरक्षा मर्यादा ओलांडते, तेव्हा त्याबद्दल आपोआप शहर प्रशासनाला त्याबद्दल संदेश पाठवला जातो, ज्यामुळे ते या भागात बचावात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत केली जाऊ शकेल.
“फारशी प्रभावी ठरत नसलेल्या सध्याच्या डोळे झाकून होणार्या फवारणी प्रक्रियेऐवजी, डसांच्या नियंत्रणासाठी डेटा- आधारित पद्धत वापरून प्रभावित ठिकाणी तात्काळ फुमिगेशन केले जाईल. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) सेन्सर्स डासांची घनतेवर लक्ष ठेवतील आणि हलचालींबद्दल मार्गदर्शन करतील,” असे एका अधिकार्याने सांगितले.
लार्विसाईडच्या फवारणीसाठी ड्रोन्सचा वापर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही प्रणाली वापरून कमी काळात अधिक जागेवर आणि कमी रसयाने वापरून ही फवारणी होईल आणि यासाठी खर्च देखील कमी येईल असेही त्यांनी सांगितले. या प्रणालीमध्ये रिअल-टाईम डॅशबोर्ड देखील असेल ज्याच्यामाध्यामातून लाईव्ह डेटा सेंट्रल सर्व्हरवर स्ट्रीम केला जाईल, ज्यामुळे सतत ट्रॅकिंग सुरू ठेवता येईल आणि त्याला प्रतिसादही देता येईल.