काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात सर्वजण ओळखतात. भले सत्तेत नसले तरी या राहुल गांधींसाठी अनेक गोष्टी आजही सहज शक्य आहेत. पण भारतात आणखी एक राहुल गांधी आहेत ज्यांच्याबद्दल फार कोणाला माहित नाही. या दुसऱ्या राहुल गांधींना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता आहे. व्यावसायिक बनण्याचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दुसरे राहुल गांधी अनेक बँकांमध्ये खेटे घालत आहेत. पण त्याचा अजूनतरी काहीही उपयोग झालेला नाही.

कोणीही त्यांना कर्ज देण्यासाठी इच्छुक नाही. या दुसऱ्या राहुल गांधींचे दुर्देव इथेच संपत नाही. दूससंचार कंपन्यांनी त्यांना सीमकार्डही नाकारले. हे दुसरे राहुल गांधी मध्य प्रदेशात इंदूरमधल्या अखंड नगरमध्ये राहतात. नावातल्या समानतेमुळे मध्य प्रदेशातल्या या राहुल गांधींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राहुल गांधी हे नाव ऐकूनच अनेकजण त्याच्याबरोबर कुठलाही व्यवहार करायला नकार देतात. दूरसंचार कंपन्यांनी नावामुळे सीमकार्ड नाकारल्यानंतर त्याला भावाच्या नावावर सीमकार्ड घ्यावे लागले.

नावावरुन अनेक जण मस्करी करतात. कोणीही विश्वास ठेवायला तयार होत नाही. मोबाइल कंपन्या कागदपत्रांवर नाव पाहूनच सीमकार्ड नाकारतात. सारख्या नावामुळे किती वाईट अनुभव येतात त्याचे उदहारण या युवकाने दिले. एकदा राहुलने कर्ज मिळवण्यासाठी बँकेत फोन केला. त्याने आपले नाव राहुल गांधी असल्याचे सांगितले. समोरचा अधिकारी नाव ऐकूनच हसला. राहुल गांधी दिल्लीवरुन इंदूरला कधी स्थायिक झाले असा प्रश्न विचारुन त्याने फोन कट केला.

सारख्या नावामुळे येणाऱ्या या वाईट अनुभवामुळे मध्य प्रदेशच्या राहुल गांधीने अखेर आडनाव बदलून मालवीय करण्याचा निर्णय घेतला आहे. आडनाव बदलल्यामुळे लोक खिल्ली उडवणार नाहीत तसेच महत्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी अडथळे येणार नाहीत. राहुल ज्या जातीतून येतो तिथे बहुतांश लोक मालवीय हे आडनाव लावतात.