भारत-पाकिस्तान संघर्षात तुर्कियेनं पाकिस्तानला समर्थन दिल्यानंतर Boycott Turkey ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. भारतातून नेटिझन्सनी तुर्कियेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, असं असलं तरी तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगन यांनी पाकिस्तान समर्थनाचीच भूमिका कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कियेची आर्थिक नाकेबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात तुर्कियेमध्ये मुख्यालय असणाऱ्या Celebi या विमानतळावरील सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला फटका बसण्यापासून झाली आहे.

दिल्लीपाठोपाठ मुंबई व अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनानेदेखील तुर्कियेस्थित सेलेबी कंपनीशी करार रद्द केले आहेत. एअरपोर्ट ग्राऊंड हँडलिंग व्यवस्थापनामधील ही एक अग्रेसर कंपनी आहे. मात्र, तुर्कियेनं भारत-पाकिस्तान संघर्षात घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीयांकडून तुर्कियेशी संबंधित अनेक गोष्टींवर बहिष्कार टाकला जात आहे. तुर्कियेतील पर्यटन स्थळांवरदेखील भारतीयांनी जाऊ नये, असं आवाहन केलं जात आहे.

दोन्ही विमानतळांनी काढलं निवेदन!

दिल्ली विमानतळानं याआधीच सेलेबीशी करार केला आहे. त्यापाठोपाठ अदाणी समूहाकडे व्यवस्थापन असणाऱ्या मुंबई व अहमदाबाद विमानतळ प्रशासनाने सेलेबीशी केलेला करार रद्द केला आहे. Celebe नं तातडीने या दोन्ही विमानतळांवरील ग्राऊंड हँडलिंगशी संबंधित बाबी विमानतळ व्यवस्थापनाकडे हस्तांतरित कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

“नव्या ग्राऊंड हँडलिंग एजन्सीच्या माध्यमातून आम्ही सर्व विमान कंपन्यांना अखंडित सेवा पुरवत राहू. सध्या Celebe कंपनीशी करारबद्ध असणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई व सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या दोन्ही विमानतळांवरील सर्व कर्मचारी हे नव्या कंपनीकडे हस्तांतरीत केले जातील. त्यांच्या कामाच्या सर्व अटी व शर्ती त्याच राहतील”, असं निवेदन दोन्ही विमानतळांच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे.

तुर्कियेच्या भूमिकेमुळे नेमकं काय घडलं?

तु्र्कियेनं पाकिस्तानची बाजू घेतल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात आर्थिक नाकेबंदीचं पाऊल उचललं. तुर्कियेस्थित सेलेबी कंपनीला भारतात सेवा पुरवण्यासाठी देण्यात आलेला सुरक्षाविषयक परवाना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी (BCAS) नं रद्द केला. भारतातील सेलेबीच्या इतर सहकाऱ्यांनाही हे बदल लागू असतील, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Celebe ची भूमिका काय?

दरम्यान, सेलेबीनं मात्र आपला तुर्कियेशी संबध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. “सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया ही खऱ्या अर्थानं एक भारतीय कंपनी असून तिचं नेतृत्व आणि व्यवस्थापन हे पूर्णपणे भारतीयांकडूनच केलं जातं. कोणत्याही निकषावर सेलेबी ही तुर्कियेची कंपनी ठरत नाही”, असं सेलेबीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीत तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांची मुलगी सुमेये एर्दोगन यांची मालकी असल्याचा दावा केला जात असून त्यावर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“कंपनाच्या मूळ संस्थेमध्ये सुमेये नावच्या कुणाचीही कोणत्याही प्रकारची मालकी नाही. कंपनीची मालकी ही सेलेबिओग्लू (Celebioglu) कुटुंबातील सदस्य कॅन सेलेबिओग्लू आणि कॅनन सेलेबिओग्लू यांच्यापुरतीच मर्यादित आहे”, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Celebe चा भारतातील व्यवसाय कोट्यवधींमध्ये

दरम्यान, सेलेबीकडून भारतात अनेक आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळांवर सुविधा पुरवल्या जातात. त्यात मुंबई, दिल्ली, कोची, कन्नूर, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई आणि गोवा या विमानतळांचा समावेश आहे. सेलेबीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, भारतात कंपनीकडून वर्षाला ५८ हजार उड्डाणं आणि ५.४ लाख टन कार्गोचं व्यवस्थापन केलं जातं. कंपनीनं यातून १० हजार भारतीयांना रोजगार पुरवला असून भारतात २२ कोटी डॉलर्सची पायाभूत सुविधांमधील दीर्घकालीन थेट गुंतवणूक केली आहे, असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.