पीटीआय, न्यूयॉर्क : अमेरिकेतील अब्जाधीश एलॉन मस्क यांनी अखेर ‘ट्विटर’ या समाजमाध्यम व्यसपीठाचा ताबा घेतला. तब्बल ४४ अब्ज डॉलरना कंपनी खरेदी केल्यानंतर मस्क यांनी ‘पक्षी मुक्त झाला’ असे ट्वीट केले. कंपनी ताब्यात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि कायदा कार्यकारी अधिकारी विजया गाड्डे यांच्यासह चार अधिकाऱ्यांना मस्क यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

ट्विटरच्या अधिग्रहण प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल आणि गाड्डे यांच्यासह मुख्य आर्थिक अधिकारी नेड सेगल आणि महाधिवक्ते सिन एडगेट यांचीही मस्क यांनी हकालपट्टी केली आहे. यापैकी किमान एकाला शब्दश: ट्विटरच्या कार्यालयातून बाहेर काढल्याची माहितीही समोर आली आहे. अग्रवाल-मस्क यांच्यात जाहीरपणे आणि खासगीतही बरेच वाद झाल्याचे वृत्त ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिले. तर कॅपिटॉलबाहेर झालेल्या दंगलीनंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद करण्यात गाड्डे यांनी पुढाकार घेतला होता.

एप्रिल महिन्यात ४४ अब्ज डॉलरचा हा व्यवहार केल्यानंतर मस्क यांनी त्यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी विविध कारणे समोर केली. मात्र कंपनीने त्यांना न्यायालयात खेचले आणि त्यानुसार शुक्रवारची मुदत संपण्यापूर्वी व्यवहार पूर्ण करावा लागला.

पराग अग्रवाल यांच्याविषयी..

३८ वर्षांचे अग्रवाल आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत. १० वर्षांपूर्वी ट्विटरमध्ये केवळ १००० कर्मचारी असताना त्यांनी कंपनीत पाऊल ठेवले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी कंपनी सोडल्यानंतर अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी झाले होते.

‘देशाचे कायदे पाळा’

मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती बदलली नसून भारतातील कायदे कंपनीला पाळावेच लागतील, असे माहिती-तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. ‘‘कुणाकडे कसली मालकी आहे, याने सरकारला काय फरक पडतो? आपले कायदे आणि नियम हे त्या कंपनीला पाळावेच लागतील, मालकी कुणाकडे आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही,’’ असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.