Mysterious Death of Woman : केरळमधल्या महिलेच्या युएईमध्ये गूढ मृत्यू झाला आहे. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबाने आरोप केला आहे की महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून हुंडाबळी आहे. आमच्या मुलीला हुंड्यासाठी छळलं जात होतं असं या विवाहितेच्या कुटुंबाने म्हटलं आहे. अतुल्या असं मृत विवाहितेचं नाव आहे. अतुल्याच्या कुटुंबाने तिच्या सासरच्या लोकांविरोधात कोलम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अतुल्याच्या कुटुंबाने काय आरोप केला आहे?
अतुल्याच्या कुटुंबाने म्हटलं आहे की,”अतुल्याचा नवरा आणि त्याच्या घरातले तिला हुंड्यासाठी शारिरीकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या छळत होते. १९ जुलैला अतुल्याचा मृतदेह तिच्या युएईतल्या घरात मिळाला. आमच्या मुलीला मारहाण होत होती आणि तिचा मानसिक छळ होत होता.” असा आरोप कुटुंबाने केला आहे.
अतुल्याच्या आईने तक्रारीत काय म्हटलं आहे?
अतुल्याच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे अतुल्याचा नवरा सतीश याला आम्ही लग्नाच्या वेळी हुंडा दिला होता. तरीही तो खुश नव्हता. २०१४ मध्ये त्या दोघांचं लग्न झालं होतं. अतुल्याच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही सतीशला हुंडा म्हणून २०१४ मध्ये बाईकही दिली होती. सतीशही कोलमचा होता. त्याला लग्नात बाईक, सोनं आणि पैसे देण्यात आले होते. दरम्यान अतुल्याच्या आईने हे सांगितलं आहे की सतीशने तिला पोटात लाथा घालून मारलं, तसंच तिचा गळा दाबला आणि थाळीने तिच्या डोक्यावर मारलं. या जिवघेण्या मारहाणीतच आमच्या मुलीचा मृत्यू झाला. आता हुंडा बंदी कायदा १९६१ नुसार सतीशच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचं गूढ उकललं गेलं पाहिजे अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.
अतुल्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला आहे, अतुल्याचे वडील काय म्हणाले?
अतुल्याने आत्महत्या केल्याचं तिच्या सासरच्यांनी सांगितलं. पण अतुल्याचे वडील म्हणाले की माझी मुलगी आत्महत्या करणं शक्यच नाही. तिच्याबरोबर काय घडलं ते आम्हाला समजलं पाहिजे. तसंच तिला काय केलं हे पण समजलं पाहिजे. अशी मागणी अतुल्याच्या वडिलांनी केली आहे. आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. सतीशला दारु प्यायची सवय होती. तो दारु पिऊनही अतुल्याला मारहाण करत होता असाही आरोप अतुल्याच्या कुटुंबाने केला आहे.