नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. मोदी यांनी सकाळी पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. पाठोपाठ आता मोदी सरकार ३.० ची पहिली कॅबिनेट बैठक चालू आहे. या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदी यांनी सर्वसामान्यांची पक्क्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी देशभर तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी म्हणाले की “आमच्या नवीन सरकारचा पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची आमची कटिबद्धता दर्शवतो. तर दुसऱ्या निर्णयाच्या माध्यमातून गरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं जाणार आहे.”

पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१० जून) सायंकाळी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, पंतप्रधान कार्यालय हे एक मोठं शक्ती केंद्र आहे. मी शक्ती केंद्र नाही तर हे कार्यालय शक्ती केंद्र आहे. मी सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. मी सत्ता काबीज करण्याचा विचार करत नाही. पंतप्रधान कार्यालय हे लोकांचं कार्यालय असलं पाहिजे, ते मोदींचं कार्यालय असता कामा नये.

दरम्यान, केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांसाठी आणि आता सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील तब्बल ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर तीन कोटी घरांसाठी निधी जारी केल्यामुळे १२ ते १५ कोटी लोकांच्या डोक्यावर हक्काचं आणि पक्कं छत तयार होणार आहे.किसान योजनेच्या १७ व्या हप्त्यामध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून २ हजार रुपयांचा हा हप्ता कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा >> गडकरींकडील जुनं खातं कायम, नड्डांकडे आरोग्य, शिंदेंच्या मंत्र्याकडे ‘या’ खात्याचा स्वतंत्र कारभार; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘एनडीए सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारताच मी पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित घेतला आहे. मी यापुढे शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करत राहणार आहे.