आधार-भीम अॅपचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला. मोदींनी यावेळी एक अनोखी घोषणा केली आहे. जर तुम्ही भीम अॅप वापरण्यासाठी कुणाला प्रोत्साहन दिले तर तुम्हाला १० रुपये मिळतील. अशी ती योजना आहे. ज्या प्रमाणे ओला आणि उबेरला रेफरल दिल्यानंतर एक राइड फ्री मिळते त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदींनी रेफरल स्कीम काढून भीम अॅपला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही योजना १४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असे पंतप्रधानांनी नागपूर येथे सांगितले. भीम-आधार हे अॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून यासाठी तुम्हाला बॅंक कार्ड किंवा फोनची आवश्यकता नाही असे पंतप्रधानांनी म्हटले. केवळ अंगठा आणि आधारकार्डाच्या आधारे तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता असे पंतप्रधानांनी सांगितले.
एकेकाळी अंगठा वापरणे हे अडाणीपणाचे लक्षण समजले जात होते परंतु आताच्या काळात जो अंगठा वापरतो तो प्रगतीचे लक्षण समजले जाईल असे मोदींनी म्हटले. भारताची रोकडविरहीत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल होत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले. रोकडविरहीत अर्थव्यवस्था हा जर रथ समजला तर भीम अॅप हा त्याचा सारथी समजला जाईल. ज्या दिवशी सर्व लोक खिशात रोकड न बाळगता सर्व व्यवहार करतील तो दिवस आनंददायी असेल असे त्यांनी म्हटले.
८ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटाबंदी केली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करुन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. तसेच जास्तीत जास्त लोकांनी रोकडरहित व्यवहार करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पेटीएम, फ्रीचार्ज, चिल्लर अशा अॅपचा वापर या काळात वाढला.
तसेच नेटबॅंकिंग, कार्डने व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले गेले. विमा, रेल्वे तिकिट बुकिंग आणि पेट्रोल-डिझेलची खरेदी केल्यास त्यावर सूट मिळेल अशी घोषणा अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी केली होती. ऑनलाइन व्यवहार केल्यास त्यातून लकी ड्रॉ काढून बक्षीस दिले जाईल असे पंतप्रधानांनी म्हटले होते. आज पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण झाले. त्यावेळी पंतप्रधानांनी ही घोषणा केली.