हिऱ्याला पैलू पाडणे आणि प्रक्रिया करण्याबरोबरच भारतामध्ये जगातील सर्वात मोठी हिऱ्याची बाजारपेठ निर्माण व्हावी, असे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.  २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाईल. तोपर्यंत भारताने हिऱ्याच्या पारंपारिक प्रक्रिया उद्योगाबरोबरच सर्वाधिक विक्रीचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी हिरे व्यापाऱ्यांना केले. मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय हिरे व्यापारी परिषदेनिमित्त ते व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे बोलत होते.

हिऱ्यांना पैलू पाडणे, त्यांना चमकवणे या कामामध्ये भारताचा जगात दबदबा आहे. परंतु हिरे विक्रीच्या बाबतीत आपण मागे आहोत. हिरे व्यापाऱ्याचे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठे योगदान आहे असे ते म्हणाले. याबरोबरच रोजगार निर्मितीच्या बाबतीतही हे क्षेत्र अग्रेसर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.  गेल्या चार दशकांमध्य हिरे आणि रत्नांच्या निर्यातीत वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.  १९६७ मध्ये भारताच्या हिरे निर्यात २८ दशलक्ष डॉलरची होती. २००७ मध्ये ४० अब्ज डॉलर हिऱ्यांची निर्यात करण्यात आली.

भारतातील हिरे व्यापाराला चालना मिळावी या उद्दिष्टाने भारताने हिरे आयात-निर्यात धोरणांमध्ये बदल केला आहे. भारतातील छोट्या व्यापाऱ्यांना देखील पैलू न पाडलेले हिरे विकत घेता यावे यासाठी भारत गेली कित्येक वर्षे प्रयत्नशील होता. काही वर्षांपूर्वी केवळ ८०-९० मोठे व्यापारीच भारताबाहेर जाऊन पैलू न पाडलेले हिरे भारतात आणत असत आणि त्यांना पैलू पाडून भारताबाहेर पाठवत असत. परंतु आता अंदाजे ३,००० छोटे-मोठे व्यापारी भारताबाहेरून हे हिरे आणतात. भारतात हिरे प्रक्रिया उद्योग उत्तम स्थितीमध्ये आहे.

माझे उद्दिष्ट हे भारताला जागतिक दर्जाची हिरे विक्रीची बाजारपेठ बनवणे आहे असे मोदी म्हणाले.  हिऱ्याच्या व्यापाऱ्यांमध्ये कुशल कामगाराचे खूप महत्त्व आहे. तुमच्या क्षेत्रातील गरीब कामगारांची मोजणी करा, असे आवाहन त्यांनी केली. हिऱ्याला पैलू पाडणारी व्यक्ती गरीब राहता कामा नये, असे ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आणलेल्या योजनांचा लाभ त्यााला मिळत आहे की नाही हे तपासून पाहावे, असे त्यांनी म्हटले. त्यांना सर्व सरकारी योजनांचे लाभ मिळत आहेत की नाही याकडे तुम्ही लक्ष द्या असे ते म्हणाले.