नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवला. विकास म्हणजे निव्वळ आकडेमोड वा तक्ते नव्हेत. मोदी यांनी विकास मानव केंद्रित करून त्याची परिभाषा बदलली, असे कौतुकोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.

रामभाऊ  म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या ‘डिलिव्हरिंग डेमोक्रसी’ या तीन दिवसांच्या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात शहा बोलत होते. मोदींच्या राजकीय कारकीर्दीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे चर्चासत्र आयोजित केले असून मोदी यांच्या शासन पद्धतीची चिकित्सा केली जाणार आहे.

मोदींनी विकास योजनांचा आकार आणि व्याप्ती बदलली. पूर्वी एखादी योजना राबवताना त्याचा किती जणांना लाभ होईल, ते सांगितले जात असे. पण मोदींनी प्रत्येक योजना देशातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. देशाचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलून टाकला. शौचालयांची योजना, निवासाच्या योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छता योजना, शद्ध पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा योजना अशा या सगळ्या कल्याणकारी योजनांत गरिबांचा जीवन स्तर उंचावण्याचा प्रयत्न मोदींनी केला. या योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक झाली, त्यातून लोकांना रोजगार मिळाला, विकासालाही चालना मिळाली. मोदींना गरिबांच्या वेदना कळतात, त्यांनी गरीब महिलांनी उपसलेले कष्ट पाहिले आहेत. चहावाल्याचे पुत्र असल्याने ते विकासाचे धोरण ठरवताना गरिबांचा विचार करतात, असे शहा म्हणाले.

अशिक्षितांची फौज घेऊन विकास होऊ  शकत नाही असे मी पुन्हा सांगतो. या माझ्या वाक्यावर खूप टीका झाली होती. मात्र, ज्याला संविधानाचा अर्थ कळत नाही, तो विकासात सहभागी होऊ  शकत नाही, असे सांगत शहा म्हणाले की, मोदींनी शिक्षणाला महत्त्व दिले आहे. एखादा व्यक्ती अशिक्षित असेल तर तो त्याचा दोष नव्हे. शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, तसे होत नसेल तर सरकारला जबाबदार धरले पाहिजे!

मोदी हे युगपुरुष – फडणवीस

मोदींनी निवडणुकांकडे पाहून निर्णय घेतले नाहीत. नेहमीच देशातील गरिबांचा विचार केला. म्हणूनच त्यांच्या आर्थिक धोरणाला मोदीनॉमिक्स म्हटले जाते. निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कधी पाऊल मागे घेतलेले नाही. त्यांनी नवे युग निर्माण केले. नव्या युगातील मूल्ये बदलली, त्या पवित्र मूल्यांच्या आधारे विकास साधला म्हणून मोदींना युगपुरुष म्हटले पाहिजे, असे म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदींनी लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवली, असेही ते म्हणाले.

बहुपक्षीय पद्धत वाचवली!

२००४ ते २०१४ या दहा वर्षांत काँग्रेस सरकारमध्ये मनमोहनसिंग यांनाच कोणी पंतप्रधान मानत नव्हते. प्रत्येक नेत्याला आपणच पंतप्रधान आहोत असे वाटत होते. यूपीए सरकारमध्ये इतकी अनागोंदी होती की, लोकशाही व्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती लोकांना वाटू लागली होती. ही गंभीर परिस्थिती बघून भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले. मोदींना बघून लोकांमधील आक्रोश कमी झाला, त्यांनी मोदींना निवडून दिले. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवलेले केंद्रातील पहिलेच बिगरकाँग्रेसी सरकार होते. यापूर्वीही वाजपेयी, मोरारजी देसाई यांची सरकारे आली मात्र ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर चाललेली वा त्यांच्या संस्कृतीतील सरकारे होती, असे शहा म्हणाले.

संविधानकर्त्यांनी बहुपक्षीय संसदीय लोकशाही स्वीकारली. त्यानुसार प्रत्येक पक्षाची निश्चित विचारसरणी असली पाहिजे असे मानले गेले. पण, ६०च्या दशकानंतर २०१४ पर्यंत लोकांना सातत्याने ही प्रणाली टिकेल की नाही याबाबत शंका होती. राज्य कसे हवे, याची व्याख्या गांधीजींनी राम राज्य या शब्दात केली आहे. या शब्दावर ज्यांचा आक्षेप होता त्यांनी कल्याणकारी राज्य असा शब्द वापरला. पण २०१४ पर्यंत ही संकल्पनाच उद्ध्वस्त होत होती. पण लोकांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले, मोदींची सत्ता केंद्रात स्थापन झाली, असा मुद्दा शहांनी मांडला.

मागे न हटणारे नेते..

मोदींनी अत्यंत कठोर निर्णय घेतले. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका असताना नोटबंदी लागू केली. तीन तलाकचा निर्णय घेतला. उरी व  पठाणकोट हल्लेखोरांना धडा शिकवणारा सर्जिकल स्ट्राइक केला. मोदींच्या कार्यकाळात राम मंदिराचा निर्णय मार्गी लागला. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० व ३५ अ काढून टाकले. सगळे निर्णय धाडसाने घेतले आणि कधीही माघार घेतली नाही. राजीव गांधींसारखे नेते दबावापुढे कसे झुकले हे देशाने पाहिले आहे, अशी टीका शहांनी केली. मोदींनी भारताच्या पारपत्राचे मूल्य वाढवले आहे. देशाकडे बोट दाखवण्याची कोणाची आता हिंमत होत नाही. संरक्षणनीती ही नेहमीच परराष्ट्रनीती मागून जात असे. पण आता संरक्षणनीतीला स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे, असे शहा म्हणाले.